बंगळुरू : उत्तर प्रदेशातील अतुल सुभाष या अभियंत्यानं सोमवारी बंगळुरूच्या मंजुनाथ लेआऊट इथल्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अतुल सुभाष यांनी 24 पानांची सुसाईड नोट लिहत पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांसह न्यायाधीशांवरही आरोप केले. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणं, छळ करणं, खंडणी आदी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अतुल सुभाषची पत्नी आणि तिच्या कुटुंबावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, असं बंगळुरूतील पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
पत्नीच्या छळाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या :पत्नीच्या छळाला कंटाळून बंगळुरूतील एआय अभियंत्यानं आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. या अभियंत्यानं आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करुन ठेवला आहे. या व्हिडिओत त्यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप केले. यासह अतुल सुभाष यांनी काही अधिकाऱ्यांवरही आरोप केले आहेत. याबाबत बोलताना पोलीस अधिकारी म्हणाले, की "होयसाळा पोलीस नियंत्रण कक्षाला सोमवारी सकाळी 6 वाजता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येबाबत फोन आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अतुल सुभाष यांच्या भावानं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही त्यांची पत्नी, तिची आई, भाऊ आणि काका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा वाद सोडवण्यासाठी 3 कोटींची मागणी करण्यात आली, त्याबाबतची तपासणी सुरू आहे."
पत्नी आणि तिच्या आईनं मानसिक त्रास देत 3 कोटीची मागितली खंडणी :"बंगळुरूतील अभियंत्यानं आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. त्यानंतर अतुल सुभाषचा भाऊ विकास कुमार याला फोन करुन घटनेची माहिती दिली. विकास कुमार यांनी नंतर अतुल सुभाषची पत्नी, त्याची सासू, मेहुणा आणि पत्नीच्या काकाविरुद्ध तक्रार दाखल केली. अतुल सुभाष यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करुन सेटलमेंटसाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला."
काय केली अतुल सुभाष यांच्या भावानं तक्रार :अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यानंतर अतुल सुभाष यांचा भाऊ विकास कुमार यांनी पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी, "अतुल सुभाष यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनं खोटी तक्रार दाखल करुन 3 कोटी रुपयाची रक्कम मागितली. त्यामुळे अतुल सुभाष याचं मानसिक संतुलनं बिघडलं. वारंवार होत असलेल्या छळानं अखेरीस त्याला आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचलण्यास भाग पाडलं." विशेष म्हणजे अतुल सुभाषनं सोशल माध्यमांवर व्हिडिओ शेअर करत एलोन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग केलं.
हेही वाचा :
- धक्कादायक! माजी उपसरपंचाचा १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पीडितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं घटना उघडकीस
- भावकीतील मुलाशी प्रेमसंबंध; प्रेमभंगातून अल्पवयीन तरुणीची आत्महत्या, प्रियकरावर गुन्हा
- मुंबईत महिला पायलटची आत्महत्या, प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एकाला अटक