रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्यामुळे छत्तीसगडमधून नक्षलवाद संपवण्याचा विडा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला. यासाठी अमित शाह यांनी रायपूरमध्ये छत्तीसगडमधील नक्षलवादावर आढावा बैठक घेतली. या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, छत्तीसगडचे मुख्य सचिव अमिताभ जैन, पोलीस महासंचालक अशोक जुनेजा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद हद्दपार करण्याचा निश्चय केला.
गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला नक्षलवादाचा आढावा : या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व सुरक्षा दलांना मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यास बजावलं. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, की "नक्षलवादाच्या विरोधात छत्तीसगड पोलीस आणि सुरक्षा दलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. सुरक्षा दलांच्या जोरदार कामगिरीमुळे गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांचं सर्वाधिक नुकसान झालं, हे मोठं यश आहे."
मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे ध्येय :छत्तीसगडमध्ये नक्षलवादानं मोठं डोक वर काढलं आहे. मात्र नक्षलवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी रायपूरमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी, "मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद संपवण्यासाठी आम्हाला अजून खूप काम करायचं आहे. एनआयए नक्षलवाद संपवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. CRPF, ITBP, BSF, छत्तीसगड पोलीस आणि DRG यांनी मिळून मोठ्या ध्येयाकडं वाटचाल केली. आगामी काळात मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद संपवू," असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
विजापूरमधील गुंडम फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसला भेट : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी विजापूरमधील गुंडम फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसला भेट दिली. यावेळी त्यांनी सैन्याच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. 2024 मध्ये नक्षलवादाच्या विरोधात मिळालेल्या यशाबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी जवानांचं अभिनंदन केलं. नक्षलवादाविरुद्धचा लढा असाच सुरू ठेवण्यास यावेळी त्यांनी जवानांना प्रोत्साहन दिलं.
हेही वाचा :
- भाजपा काँग्रेसमुक्त भारत करता करता प्रादेशिक पक्षमुक्त भारत करू पाहतंय का?
- भाजपा काँग्रेसमुक्त भारत करता करता प्रादेशिक पक्षमुक्त भारत करू पाहतंय का?
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : काँग्रेसचा राज्यसभा सभापतींवर बोलू देत नसल्याचा आरोप, जयराम रमेश आक्रमक