मुंबई- राज्यभरात बनावट औषधांचा सुळसुळाट वाढला असून, पुण्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातूनही कोट्यवधी रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासना (FDA)च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिलीय. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात बनावट औषधं पुरवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. खबरदारी म्हणून ठेकेदाराकडून पुण्यातील ससून रुग्णालयाला जी औषधं पुरवण्यात आली होती, त्याचा वापर थांबविण्यात आलाय. तसंच सध्या उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची चाचणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती, ससून हॉस्पिटलचे डीन एकनाथ पवार यांनी दिली.
औषधांचा वापर थांबवण्यात आला : याबाबत डीन डॉ. एकनाथ पवार म्हणाले, "आमच्या वरिष्ठांच्याबरोबर एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये जे निर्देश देण्यात आले होते, त्यात काही औषधांच्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्या होत्या. यात ज्या पाच कंपन्या आहेत, त्यांची औषधं बनावट असल्याचं समोर आलं होतं. ज्या कंपनीच्या विरोधात तक्रार झालीय, अशा कुठल्याही कंपनीची औषधं आपल्याकडे खरेदी करण्यात आलेली नाहीत. परंतु या पाच कंपन्यांच्या वितरकांविरोधात देखील तक्रार प्राप्त करण्यात आली असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून या ठेकेदाराकडून जी औषधे ससून हॉस्पिटलने खरेदी केलीत. त्या औषधांचा वापर थांबवण्यात आलाय, तसंच एफडीएला पत्र देऊन ही औषधं तपासणीसाठी पाठवण्यात आलीत.
कोणती औषधे वापरण्यात आलीत? : ठेकेदाराकडून ससून हॉस्पिटलला डायक्लोफिनॅक, मीडिआझोलम, कॅल्शियम, डेक्सामिथसोन आणि मिझोप्रोस्टॉल ही औषधे पुरविली. ही औषधे याआधी वापरण्यात आलीत. उर्वरित औषधांपैकी डायक्लोफिनॅक (4040 गोळ्या), मीडिआझोलमच्या (1440), कॅल्शियम (120), डेक्सामिथसोन (5 हजार) आणि मिसोप्रोस्टॉलचे (7500) अशी औषधे शिल्लक आहेत. मात्र, आता याचा पुरवठा बंद करण्यात आला असून, ती औषधे तपासणीसाठी पाठविण्यात आलीत.
नारपोली येथील गोदामामध्ये बनावट औषधसाठा : दुसरीकडे भिवंडी शहरातून बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं समजल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करीत 1 कोटी 85 लाख रुपयांचा साठा जप्त केला होता. तसेच ही औषधं अँटिबायोटिक (प्रतिजैविक) आहेत. या प्रकरणी औषध प्रशासन विभागाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलीय. आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असून त्यादिशेनं अन्न आणि औषध प्रशासनाचा तपास सुरू केल्याचं समजतंय. भिवंडीमधील नारपोली येथील गोदामामध्ये बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या औषधांचा साठा विक्रीस प्रतिबंधित केलाय. या औषधांचे नमुने तपासल्यानंतर ते बनावट आढळून आले. त्यानंतर पथकानं 1 कोटी 85 लाख रुपयांच्या बनावट औषधांचा साठा जप्त केलाय. या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बनावट औषधांची रुग्णांना विक्री : बनावट औषधांची विक्री रुग्णांनाही झालीय. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून त्यादिशेनं अन्न आणि औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बनावट औषधांप्रकरणी आठ गुन्हे दाखल झालेत. या बनावट औषधांची सरकारी रुग्णालयांमध्येही विक्री झाल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान बनावट औषध विक्रीचं रॅकेट जिल्ह्यात उघडकीस आल्यानंतर रुग्णांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मनुष्याच्या औषध निर्मितीचे परवाने नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या सरकारी रुग्णालयात अँटिबायोटिक टॅबलेटचा पुरवठा करणाऱ्या एकही कंपनीकडे औषध निर्मितीसाठीचा "गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस" म्हणजेच GMP सर्टिफिकेट नसल्याचे पोलीस तपासात पुढे आलेआणखी धक्कादायक बाब म्हणजे हरिद्वारमधील ज्या औषध निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीमधून अँटिबायोटिक टॅबलेटचा पुरवठा महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये होत होता. त्या औषध निर्मिती फॅक्टरीकडे मनुष्याच्या औषध निर्मितीचे परवाने नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. त्या फॅक्टरीकडे जनावरांच्या औषधांच्या निर्मितीचे परवाने होते, अशी माहिती ही पोलिसांनी दिली होती.
लोकांच्या आरोग्याशी खेळ : एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात असे आढळून आले आहे की, आरोपी बनावट औषधांची निर्मिती आणि विक्री करीत होते आणि ती त्याच खऱ्या कंपनीची असल्याचा खोटा दावा करीत होते. तक्रारीनुसार ही औषधे अनेक राज्यांमध्ये पाठवली जात होती. त्यामुळे रुग्णांची फसवणूक होऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता.
प्रकरणाचा तपास सुरू : या प्रकरणाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस आणि एफडीए मिळून बनावट औषधांच्या उत्पादनाची ठिकाणे आणि वितरणाची साखळी ओळखण्यासाठी तपास करीत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी शनिवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 (4) (फसवणूक), 276 (औषधांमध्ये भेसळ), 277 (भेसळयुक्त औषधांची विक्री), 278 (वेगवेगळ्या औषधांची विक्री) अंतर्गत गुन्हा दाखल केला. यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट औषधांचा व्यवसाय अनेक राज्यांत पसरलेला : ही औषधे अनेक राज्यांत पाठवून रुग्णांची फसवणूक करून सार्वजनिक आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता, तसेच औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केलाय.ही बनावट औषधे कुठे तयार केली जात होती, पॅकेजिंग साहित्य कोठून आणले जात होते आणि बाजारात त्यांची (औषधे) विक्री करणारे कोण होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस आणि एफडीए मिळून करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचाः
बनावट औषध प्रकरण; ठेकेदाराने पुरवलेल्या औषधांची ससून हॉस्पिटलकडून होणार तपासणी
'आता किती आदळआपट केली, तरी हाती खुळखुळाच' ; संजय राऊतांचा नाराज छगन भुजबळ, मुनगंटीवारांवर हल्लाबोल