गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : आईवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून तसंच सतत होत असणाऱ्या भांडणावरून एका 25 वर्षीय तरुणानं धारदार कोयत्यानं महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील शिंगी येथे बुधवारी (29 जाने.) रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. यातील महिला गंभीर जखमी आहे. महिलेवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच गंगापूर पोलिसांनी तपासाची चक्रं जलद गतीनं फिरवत आरोपीस जेरबंद केलंय.
काय आहे प्रकरण? : शिंगी येथील अलिशा निजाम शेख (वय 55) या बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शौचास जात असताना गावातील शकुर मुसा शेख यानं त्यांना रस्त्यात गाठून त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. कुटुंबीयांनी जखमी महिलेस गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून जखमी महिलेला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवलं.
आरोपीला अटक : या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, बीट अंमलदार मनोज घोडके, संदीप राठोड, पदमकुमार जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमी महिलेचे पती निजाम छोटु शेख (वय 60) यांच्या तक्रारीवरुन आरोपी शकुर मुसा शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीनं फिरवत आरोपीस रात्री आठ वाजेच्या दरम्यान जेरबंद केलंय. या प्रकरणी अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक आश्विनी कुंभार करत आहेत.
आरोपीच्या आईवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून शकुर मुसा शेख या आरोपीनं धारदार कोयत्यानं महिलेवर सपासप वार केल्यानं महिला गंभीर जखमी झाली होती. घटनेच्या तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं होतं. श्वानानं आरोपीच्या घराचा मागोवा घेतला. त्यानंतर शोध घेऊन 8 वाजण्याच्या सुमारास आरोपीस जेरबंद करण्यात आले.- कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक
हेही वाचा -