मुंबई : आपल्या विरोधात राजकीय सूडबुद्धीतून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत संजय पांडेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. संजय पुनमिया यांनी आपल्या विरोधात ठाणे पोलिसांत दाखल केलेला खंडणीचा गुन्हा, फौजदारी कट रचण्याचा आणि बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याचा गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीतून दाखल केलाय. त्यामुळे हे गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय. याप्रकरणी पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी ठेवण्यात आलीय.
राजकीय आकसाने आणि सूडबुद्धीनं गुन्हे नोंदवले : जून 2022 मध्ये संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. पांडे यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याविरोधात राजकीय आकसाने आणि सूडबुद्धीनं गुन्हे नोंदवले गेले आणि कारवाई केली गेली, असा दावा पांडे यांच्यामार्फत सुनावणी दरम्यान करण्यात आलाय. तक्रारदार संजय पुनमियाविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. याकडे पांडे यांच्यातर्फे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आलंय आणि पुनमिया यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात आलंय.
पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार : याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. संजय पुनमिया यांच्या वकिलांनी या याचिकेवर आक्षेप घेत विरोध केलाय. या प्रकरणी प्रतिवादीचा युक्तिवाद अपूर्ण राहिलाय, त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. संजय पांडे पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये नुकतेच काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. राजकीय सूडबुद्धीने आपल्या विरोधात कारवाई करून आपल्याला विनाकारण या प्रकरणात अडकवण्यात येत असून, हे गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी संजय पांडेंनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केलीय.
हेही वाचा :