पाकिस्तानच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नरसीचा तरुण; देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयातून सूरत पोलिसांनी घेतलं ताब्यात - Youth Arrest From Narsi
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 13, 2024, 4:41 PM IST
नांदेड Youth Arrest From Narsi : पाकिस्तानच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या तरुणास सुरत पोलिसांनी देशविरोधी कृत्यात सहभागी असल्याच्या संशयावरुन नरसी येथून एका तरुणास ताब्यात घेतलं. 18 वर्षीय शेख शकील शेख सत्तार (रा. नरसी, ता. नायगाव) असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानी तरुणांनी तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होता. हा ग्रुप पाकिस्तानातील वकास आणि सरफाज डोगर हे चालवित होते. या ग्रुपमध्ये सूरत येथील सोहेल टीमोल आणि बिहार येथील शहनाज हे दोघंही सहभागी होते. हे सर्वजण या ग्रुपमध्ये हिंदू विरुद्ध तरुणांना भडकवण्याचं काम करायचे.
हिंदुत्ववादी नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या : या सर्वांनी मिळून सनातन संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह हैदराबाद येथील एका हिंदुत्ववादी नेत्याला आणि दोन ज्येष्ठ पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा दिल्या. तसेच परदेशातून शस्त्रे आयात करण्याच्या त्यांच्या व्हॉट्सअप चॅटिंगसुद्धा पोलिसांना सापडल्या आहेत. त्यांच्यावर सूरत पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक पोलिसांचीही मदत : नरसीच्या शेख शकील शेख सत्तार याचा त्यात समावेश असल्यानं रविवारी सूरत पोलिसांनी त्याला नरसी येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन सूरतला नेलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. हा तरुण या कटात सहभागी होता की नाही, हे तपासाअंती समजणार आहे. या संदर्भात स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली.