Political Crisis In NCP : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची सभा, सभेची पूर्वतयारी पूर्ण
🎬 Watch Now: Feature Video
येवला : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी राज्यात सभा घ्यायला सुरवात केली आहे. पवारांनी बंडखोरीनंतर पहिली सभा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार बंडखोर आमदार छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेणार आहेत. येत्या 8 जुलै रोजी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी आज ॲड. माणिकराव शिंदे यांच्या रायगड या निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते देखील उपस्थित होते. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता शरद पवारांची सभा होणार असल्याची माहिती माणिकराव शिंदे यांनी दिली आहे. या सभेला खासदार, आमदार यांच्यासह माजी मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. अजित पवार यांच्या युतीत सहभागी झाल्यामुळे शिवसेना आणि भाजपचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या काही आमदारांनीही अशीच विधाने केली आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रकरणाचा खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या गटाला 9 मंत्रीपदे देण्यात आली आहेत.