Drug Addicts Rebirth Celebration: व्यसनमुक्त झालेल्या लोकांचा नागपूर पोलिसांनी केला साजरा पुनर्जन्म वाढदिवस - नागपूर पोलिसांचा उत्कृष्ट कार्य
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर: व्यसनमुक्त झालेल्या ज्या लोकांनी व्यसनाचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगण्याचे निश्चित केले आहे अशा लोकांचा जणू पुनर्जन्म झाला असतो. अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून नागपूर पोलिसांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. व्यसनमुक्त लोकांची हिम्मत वाढावी, जगण्याची उमेद कायम राहावी, त्यांना तिरस्कारा ऐवजी प्रेम देता यावे म्हणून नागपूर पोलिसांनी त्यांचा पुनर्जन्म वाढदिवस साजरा केला आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने याचे आयोजन करण्यात आले होते. मैत्री व्यसनमुक्ती संस्था आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नाने नागपूरला व्यसनमुक्त शहर बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. व्यसनमुक्त झालेल्या ३० व्यक्तींचा या ठिकाणी पुनर्जन्म समजून वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला. सोबतच त्यांचा सत्कारसुद्धा यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात व्यसनमुक्ती संस्थेचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. जे व्यसनमुक्त झाले त्यांना समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी काम करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी यावेळी केले. नागपुरच्या जनतेने शहराला 'ड्रग्स फ्री' करण्यात मोठी भूमिका वठवावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. जागरूक नागरिकांनी ड्रग्स संदर्भातील माहिती आम्हाला द्यावी. त्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे देखील ते म्हणाले आहे. नागरिक जोपर्यंत पुढे येऊन सहकार्य करणार नाही तो-पर्यंत शंभर टक्के 'ड्रग्स फ्री' नागपूर कधीही होऊ शकत नाही, असे देखील त्यांनी सांगितले. नागपूर पोलिसांनी एक पोस्टर लॉन्च केले आहे. ज्यात एक डेलिकेटेड नंबर देण्यात आला आहे. ते पोस्टर शहरातील पब, धाबे, हॉटेल्स सारख्या ठिकाणी लावले जाणार आहे. शिवाय तरुणांचे हॉटस्पॉट असलेल्या परिसरावर विशेष नजर पोलिसांची असेल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.