मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा कसून तपास करत आहे. "या बँकेचं ऑडिट करणाऱ्या फर्मच्या प्रतिनिधींना गुन्हे शाखेनं समन्स बजावला आहे. या फर्मच्या प्रतिनिधींना गुन्हे शाखेनं चौकशीसाठी बोलावलं आहे," अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वेगवेगळ्या वर्षी बँकेचं 7 फर्मतर्फे ऑडिट करण्यात आलं. त्यापैकी एका फर्मच्या भागीदाराची चौकशी सुरू आहे.
'या' फर्मच्या प्रतिनिधींना बजावण्यात आलं समन्स : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "2019 ते 2014 या कालावधीत 7 फर्मद्वारे वेगवेगळं ऑडिट करण्यात आलं. याच कालावधीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ऑडिट करणाऱ्या यू जी देवी ॲण्ड कंपनी, गांधी ॲण्ड असोसिएट्स, शिंदे-नायक ॲण्ड असोसिएट्स, जैन त्रिपाठी ॲण्ड कंपनी आणि एस. आय. मोगुल ॲण्ड कंपनी या 6 कंपन्यांना समन्स बजावण्यात आला आहे. तर, 2019 पासून काही वर्षे ऑडिट करणाऱ्या संजय राणे असोसिएट्सचे भागीदार अभिजीत देशमुख यांची गेल्या 4 दिवसांपासून चौकशी सुरू आहे. आता संजय राणे यांनाही समन्स बजावून जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अभिजीत देशमुख हे आरबीआयनं बँकेवर नेमलेल्या सल्लागारांपैकी एक आहेत. गरज भसल्यास फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येईल, असंही या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पोलीस घेत आहेत अरुणभाईचा शोध : बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भुवान यानं सर्व ऑडिट रिपोर्टवर स्वाक्षऱ्या केल्या. त्याला तसेच बँकेचा माजी सरव्यवस्थापक हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांना अटक करण्यात आली. एक आरोपी अरुणभाई हा फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
हितेश मेहतानं ट्रस्टच्या माध्यमातून वळवले 50 कोटी : आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "हितेश मेहता यानं अरुणभाई याच्या मदतीनं दोन ट्रस्टच्या माध्यमातून 50 कोटी रुपये वळवल्याचं तपासात आढळलं. बँकेतून मेहता यानं 50 कोटी रुपये रोख काढले आणि अरुणभाई याला दिले. ही रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा करुन हा पैसा काळ्याचा पांढरा केला. मात्र, या ट्रस्टची नावं मेहतानं उघड केली नाही."
आरबीआयकडून मिळाले महत्त्वाचे पुरावे : "बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव या शाखेतील 122 कोटी रुपयांची रोख रक्कम कमी आढळली. ही बाब तपासात उघड झाल्यानंतर आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी मेहता याची चौकशी केली. त्यानं या रकमेचा अपहार केल्याची कबुली दिल्याचा व्हिडिओ आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केला. तो व्हिडिओ आरबीआयनं आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सोपवला आहे. याशिवाय आरबीआयनं गेल्या 5 वर्षांचे ऑडिट रिपोर्ट आणि इतर कागदपत्रंदेखील दिले," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. "या रकमेतून मेहता यानं काही मालमत्ता खरेदी केल्या का ? याचीही माहिती गोळा करण्यात येत आहे. यासाठी आयकर विभाग आणि पुण्यातील मुद्रांक नोंदणी महानिबंधकांकडं माहिती मागितली आहे. ती माहिती मिळाल्यास मेहताच्या नावावर असलेल्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करता येईल," असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :