मुंबई - सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणी सिद्धार्थ पिठानीला आज कोर्टाने न्यायालयीन कोठडीत धाडले आहे. 28 मे रोजी सिद्धार्थ पिठानीला हैदराबाद कोर्टातून ट्रान्झिट वॉरंट मान्य झाल्यावर तेथून मुंबई कोर्टात हजर केले होते आणि न्यायालयाने सिद्धार्थला एनसीबी कोठडीत पाठवले होते.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. ड्रग्स प्रकरणात ही अटक करण्यात आली होती. सिद्धार्थ पिठानी याला हैदराबाद येथून अटक केल्याचे सांगण्यात आले होते. एनसीबीची एक टीमने सिद्धार्थ पिठानीला मुंबईत घेऊन आल्यानंतर मुंबईतील न्यायालयाने एनसीबीच्या कोठडीत धाडले होते. जिथे त्याची चौकशी करण्यात आली होती.
सुशांत आणि सिद्धार्थचे कनेक्शन
सिद्धार्थ पिठानी सुशांत सिंह राजपूतच्यासोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. सिद्धार्थने सर्वात पहिल्यांदा सुशांतचा मृतदेह पहिला होता. सुशांत सिंह राजपूत याचे 14 जून 2020 रोजी निधन झाले होते. त्याने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास लावून घेतला. सुशांतच्या मृत्यूने सर्वांना हादरवून सोडले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनीही त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले होते. सुशांत मृत्यू प्रकरणातील तपासादरम्यान ड्रग्स अँगलही समोर आला. या प्रकरणाची अंमलबजावणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो करीत आहे. यात रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती अशा बर्याच जणांची नावे समोर आली होती. सिद्धार्थ पिठाणी हादेखील त्यापैकी एक होता.
हेही वाचा - 'ड्रीम गर्ल' अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभचा कोरोनामुळे मृत्यू