आतापर्यंत मालिकांमध्ये सासू आणि सून एकमेकींचा दुस्वास करताना दिसत होत्या. आता मात्र जमाना बदललाय आणि सून आणि सासू यांच्यात मैत्रीसुद्धा होऊ शकते हे वास्तव आहे. हेच वास्तव ‘असे हे सुंदर आमचे घर’ मधून दिसत असले तरी त्यात तीन वेगवेवळ्या पिढ्यांमधल्या स्त्रिया कथानकाचा मुख्य भाग आहेत. ‘असे हे सुंदर आमचे घर’ या सोनी मराठीवरील नव्याकोऱ्या मालिकेत सासू सूनेची गोड जोडी आणि त्यांचे कुटुंब प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. तीन वेगवेवळ्या पिढ्यांमधल्या स्त्रिया आणि त्यांच्यातल्या जुन्या आणि आधुनिक वैचारिक भेदांमुळे काय घडतं आणि नेमके कोणाचे विचार बदलतात हे या मालिकेत पहायला मिळणार आहे.
या मालिकेमध्ये नारायणी म्हणजे उषा नाडकर्णी खाष्ट सासूच्या तर सुभद्रा म्हणजे सुकन्या मोने प्रेमळ सासूच्या भूमिकेत दिसून येत आहे. उषा नाडकर्णी बर्याच वर्षांनी मराठी मालिकेत दिसत असल्याने प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या एका कुटंबात स्त्रियांचे महत्त्व पटवून देण्यात काव्या म्हणजे मालिकेची नायिका संचिता कुळकर्णी यशस्वी होईल का हे बघणे औत्सुक्याचे ठरत आहे.या नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, सुकन्या मोने आणि संचिता कुलकर्णी अशा लोकप्रिय अभिनेत्रींचा समावेश आहे. अभिनेता संचित चौधरी या मालिकेत रितेश या भूमिकेत दिसणार असून दीपक आलेगावकर, संयोगिता भावे, मुकुंद फाटक, राजश्री वाड, विजय पटवर्धन, प्रसाद पंडीत, वेदश्री दाली, ओम जंगम, दीपेश ठाकरे अशी तगड्या कलाकरांची फळी या मालिकेत झळकत आहे. सासू सूनेमधील मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते या मालिकेत अधोरेखित होत आहे.
असे हे सुंदर आमचे घर सोनी मराठीवर एखादी मुलगी लग्न करुन घरी आली की घरातील सासू ही तिची पहिली मैत्रीण असते. 'असे हे सुंदर आमचे घर' या मालिकेतही काव्या 'राजपाटील' यांच्या घरात लग्न करुन येते आणि तिचे तिच्या सासूशी चांगले सूत जमते. परंतु काव्याची आजेसासू म्हणजे नारायणी या सासू सुनेमध्ये मैत्री होऊन देते की नाही, हे या मालिकेत बघायला मिळणार आहे. वर्षानुवर्ष फक्त 'घर एके घर' असं जीवन जगलेल्या सुभद्रा म्हणजे सुकन्या मोने यांना त्यांच्या घरात नव्याने लग्न करुन आलेली सून काव्या घरातून बाहेर पडून मोकळा श्चास घेण्यासाठी उद्युक्त करते. सासू आणि सुनेमध्ये असणारे मैत्रीचं नातं ही मालिका अधोरेखित करणार आहे. तीन पिढ्यांतील सूना म्हणजे काव्या, सुभद्रा आणि नारायणी एकाच घरात वावरत असताना काय गंमतीजमती घडतात हे पाहणंही मनोरंजक ठरणार आहे.मालिका सुरु झाल्यावर पहिल्या आठवड्यात सुभद्राला तिच्या संकटावेळी काव्या मदत करते आणि त्यांच्यात मैत्रिणींचे नाते फुलू लागले आहे. तर दुसरीकडे रितेश आणि काव्या यांच्यात मजेशीर नोकझोक पहायला मिळाली आहे. आता काव्या आणि रितेश यांच्यात प्रेमाचे बंध कसे जुळणार, नारायणी काव्याला नातसून म्हणून स्विकारणार का तसेच राजपाटील यांच्या घरात काव्या सून म्हणून जाणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.
हेही वाचा - ‘चूल आणि मूल’ यात न अडकता शिक्षणाची कास धरलेल्या मुलीची कहाणी, ‘रिवणावायली'!