मुंबई- गाव-खेड्यातील आणि ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून एसटी अर्थात लालपरीकडे पाहिले जाते. आजही लालपरी ही ग्रामीण भागातील लोकांचे दळणवळणाचे मोठे साधन समजले जाते. परंतु हीच लालपरी मागील काही दिवसांपासून तोट्यात असल्याचे समोर आलंय. एसटीचे आर्थिक उत्पन्न समाधानकारक होत नसल्याने एसटी डबघाईत आहे, अशी ओरड ऐकायला मिळते. परंतु आता आगामी काळात एसटीचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रयत्न केले जाणार असून, यासाठी अर्थ खात्याची मदत घेतली जाणार आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधलाय. त्यावेळी ते बोलत होते.
अर्ध्या तिकिटाची सवलत बंद होणार नाही : एसटी डबघाईत आलेली असून, तोट्यात आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने एसटीत महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत योजना आणली होती. या योजनेमुळं एसटीला भुर्दंड सोसावा लागतोय. एसटीच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे महिलांना एसटीत अर्धे तिकीट ही सवलत योजना सरकारकडून बंद केली जाणार का? असा प्रश्न सरनाईक यांना विचारला असता ते म्हणाले, एसटीतील उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते वेगळ्या माध्यमातून वाढू शकतात. पण सरकारने जी महिलांसाठी अर्ध्या तिकिटाची सवलत योजना आणली आहे, ती योजना कुठेही बंद होणार नाही, असं यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच डिजिटल बोर्डबाबत माहिती आणि जनसंपर्क विभागाने जी निविदा परस्पर काढली होती. त्याची माहिती परिवहन विभागाला देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे ती निविदा रद्द करण्याचे आदेश आम्ही माहिती आणि जनसंपर्क विभागाला दिले आहेत.
गुजरातचे मॉडेल राबवणार : आम्ही काही वर्षांपूर्वी गुजरात दौरा केला होता. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री हे नरेंद्र मोदी होते. तेव्हा गुजरातमधील एसटी डेपो हे अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि अद्ययावत आम्हाला दिसले. परंतु याच्या उलट महाराष्ट्राचे चित्र आहे. महाराष्ट्रातील एसटी डेपोची दुरवस्था झालेली आहे. अस्वच्छ डेपो आहेत. परंतु एसटी डेपोतील कायापालट करण्यासाठी आणि तिथे स्वच्छता राखण्यासाठी आम्ही गुजरात मॉडेल राबवणार आहोत, असं सरनाईक यांनी सांगितले. तसेच आमच्या पक्षात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी आमदार प्रवेश करीत आहेत. कारण पक्षाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या कामावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे आमच्या पक्षात लोक प्रवेश करतात, असेही पक्षप्रवेशावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा -