मुंबई– मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील लाकडी भट्ट्या वापरणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याचे आदेश पालिकेने जारी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय, तर दुसरीकडे मुंबईतील विविध विकासकामांच्या बांधकामांवरदेखील महापालिकेने 29 नियम जारी करून निर्बंध आणलेत. अशातच आता नव्याने महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातील लाकडी चुली बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय. धोबी घाटातील व्यावसायिकांना पाणी गरम करण्यासाठी पाइपलाइननं गॅस पुरवला जाईल, असे प्रशासनाने म्हटलंय. हे सगळं सुरू असतानाच दादर येथील स्मशानभूमी भेटीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना पारंपरिक लाकडी स्मशानभूमीलादेखील पर्याय शोधण्याच्या सूचना केल्यात. त्यामुळे आता पालिका प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईतील पारंपरिक लाकडी स्मशानभूमी पूर्णपणे बंद करण्याची तयारीत आहे का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
स्मशानभूमीत काही आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना : 19 फेब्रुवारी रोजी आयुक्त भूषण गगराणी यांनी दादर येथील स्मशानभूमीला भेट दिलीय. यावेळी त्यांनी स्मशानभूमीत काही आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात. या सूचनांमधील एक महत्त्वाची सूचना होती ती म्हणजे, पारंपरिक लाकडी चितेला पर्याय शोधण्याच्या सूचना त्याच भेटीदरम्यान आयुक्तांनी दिल्यात. महानगरपालिकेने वर्ष 2025 च्या नागरिक दैनंदिनीत प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत आज घडीला 70 हिंदू स्मशानभूमी आहेत. यात 10 विद्युत दाहिनी अजून 18 गॅस दाहिनी आहेत. यातील विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनीच्या संख्येत वाढ करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

मुंबईत प्रदूषणाच्या वाढीस विविध घटक कारणीभूत : महापालिकेने बेकऱ्यांवर कारवाई केल्याने मोठा वाद निर्माण झालाय. आता मुंबईत प्रदूषणाच्या वाढीस विविध घटक कारणीभूत असल्याचे महानगरपालिका म्हणते. मुंबईतील प्रदूषणाच्या वाढीस विविध घटक कारणीभूत आहेत. यात मेट्रोचे बांधकाम, रस्त्यांवरून धावणारी वाहने, विविध विकासकामे आणि बेकऱ्यांच्या भट्ट्या जबाबदार असल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे आहे. या संदर्भात वर्ष 2017–18 मध्ये आयआयटी मुंबईने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला एक अहवाल सादर केला होता. या अहवालात त्यांनी कोणत्या घटकामुळे किती प्रदूषण होते याची आकडेवारी दिली आहे.
विमान वाहतुकीमुळे देखील प्रदूषणात वाढ : आयआयटी मुंबईच्या वर्ष 2017-18 च्या अहवालानुसार मुंबईत मेट्रोच्या बांधकामामुळे प्रतिवर्षी 706 किलोग्रॅम वाढ होते तर मुंबईत सुरू असलेल्या विविध इमारतींच्या बांधकामामुळे 2 हजार 718 टन प्रति वर्ष प्रदूषणात वाढ होत आहे. यात विमान वाहतुकीमुळे देखील प्रदूषणात वाढ होत असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले आहे. विमान वाहतुकीमुळे 152.771 किलोग्रॅम प्रति वर्ष प्रदूषणात वाढ होत असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटलंय. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बेकरीमुळे 3 हजार 270 किलोग्रॅम प्रतिदिन प्रदूषणात वाढ होते. विशेष म्हणजे ही आकडेवारी केवळ लाकडी भट्ट्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची आहे. आयआयटी मुंबईचे रिपोर्टनुसार लाकडी भट्ट्यांच्या तुलनेत एलपीजी भट्ट्यांमुळे 1.11 किलोग्रॅम प्रतिदिन प्रदूषणात वाढ होते. तर, विद्युत भट्ट्यांमुळे 0.026 किलोग्रॅम प्रतिदिन प्रदूषणात वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटलंय.
लाकडी दाहिन्यांमुळे प्रदूषण होत असल्याचं नमूद : आयआयटी मुंबईच्या 2017–18 च्या अहवालात एकूण 88 हिंदू स्मशानभूमी असल्याचे म्हटलंय. यात 42 पारंपरिक लाकडी शवदाहिन्या असून, 11 विद्युत शवदाहिन्या असल्याचे नमूद करण्यात आलंय. यात 35 खासगी हिंदू स्मशानभूमी असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटलंय. या अहवालानुसार, वर्ष 2017-18 या एका वर्षात पारंपरिक लाकडी पद्धतीने 40 हजारांहून अधिक जणांना अग्नी देण्यात आलाय. तर, विद्युत दाहिनीत 9 हजार 707 लोकांना अग्नी देण्यात आला. यात लाकडी दाहिन्यांमुळे 2 लाख 7 हजार 755 किलोग्रॅम प्रति वर्ष प्रदूषण होत असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटलंय.
प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील : यासंदर्भात महापालिका प्रशासनाने म्हटले आहे की, पारंपरिक लाकडी दाहिन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. जून 2024 मध्ये मृतदेहाच्या दहनासाठी लाकडाऐवजी पर्यायी इंधन म्हणून ब्रिकेट्स किंवा पॅलेट्स बायोमासचा वापर करण्यासाठी 14 स्मशानभूमी निश्चित करण्यात आल्यात. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळतानाच वायू प्रदूषण टाळण्यासाठीही मदत होते. मृतदेहाच्या दहनासाठी कम्बशन चेंबरचा वापर करण्यात येतो. तसेच दाहिनीच्या भट्टीच्या विशिष्ट रचनेमुळे कमीत कमी लाकडांचा वापर हा दहनाच्या प्रक्रियेत होतो. परिणामी प्रदूषणात घट करण्यासाठी मदत होते, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
अतिशय सोप्या पद्धतीने धार्मिक विधी करणे शक्य : प्रत्येक मृतदेहाच्या दहनासाठी लागणाऱ्या 350 किलो ते 400 किलो लाकडांच्या तुलनेत 100 ते 115 किलो इतक्या लाकडाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सरासरी 250 किलो इतक्या लाकडाची बचत प्रत्येक दहनाच्या प्रक्रियेत होणार आहे. परिणामी कार्बन उर्त्सजनाचे प्रमाणही कमी होण्यासाठी यंत्रणा उपयुक्त आहे. पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशी अद्ययावत स्वरूपाची लाकडी दहन यंत्रणा जरी तयार करण्यात आलेली असली, तरीही धार्मिक विधींसाठीचा विचारही या संरचनेत करण्यात आलाय. ट्रॉलीच्या बाहेरील बाजूच्या सुविधेमुळे अतिशय सोप्या पद्धतीने धार्मिक विधी करणे शक्य असल्याचे पालिकेने म्हटलंय.
प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार : तसेच ऊर्जा वहनासाठी कमीत कमी धूर पर्यावरणात चिमणीतून जाईल, अशा पद्धतीची संरचना दहन यंत्रणेसाठी करण्यात आलीय. विशिष्ट व्यवस्थेमुळे कमीत कमी धूर निर्माण होतो. वॉटर स्क्रबर आणि सायक्लोनिक सेपरेटरमध्ये वायू प्रदूषकांमधील कण आणि विषारी वायू काढून टाकले जातात. या प्रक्रियेनंतर निर्माण झालेली हवा 30 मीटर उंच चिमणीमधून हवेत सोडली जाते. मुंबईतील 9 ठिकाणी या यंत्रणेच्या अंमलबजावणीनंतर सध्याचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटलंय. या संदर्भात आम्ही पर्यावरण विभागाचे उपायुक्त राजेश ताम्हाणे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, हरित स्मशानभूमीसाठी महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केलीय. विद्युत दाहिनीसोबतच महापालिकेने आता सीएनजी आणि पीएनजी गॅस आधारित दाहिन्या सुरू केल्यात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर या दाहिन्या सुरू असून त्याच्या काळात त्यांची संख्या वाढवली जाणार आहे.
हेही वाचा -