यावर्षीच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात वाहिनीच्या कलाकारांच्या उत्साहात न्हाऊन निघालेली शोभायात्रा पाहायला मिळेल. मन सुखाने भरे तुडुंब, जेव्हा एकत्र येई कुटुंब, सण साजरे एकत्र करू, धम्माल मस्ती फेर धरू, कौतुक कर्तृत्वाचे करूया, नाते आपुलकीचे घट्ट जपूया, चला, परंपरा आपली राखूया, मराठी संस्कृती जपूया...असे म्हणत स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यातच प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी आहे. ती म्हणजे स्टार प्रवाह वरील मालिकांमधील सासू- सूनांच्या जोड्या गौरी-माई, दीपा- सौंदर्या, अरुंधती- अनघा, अबोली-रमा धमाकेदार गाण्यांवर थिरकणार आहेत.
यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याचं कुतूहल आहेच. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत. यंदाच्या सोहळ्याची खासियत म्हणजे सासू-सूनांचे धमाकेदार परफॉर्मन्स. एरव्ही मालिकांमध्ये सासू- सूनांना आपण वेगळ्या रुपात पहात असतो. मात्र स्टार प्रवाह परिवार सोहळ्यात याच सासू- सूनांचं अनोखं रुप पाहायला मिळणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी-माई, रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा- सौंदर्या, अबोली मालिकेतील अबोली-रमा आणि आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती- अनघाचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना या सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल.
परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा प्रेक्षकांचे दुप्पट मनोरंजन करेल यात शंकाच नाही. हा कार्यक्रम रविवार ३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - आलियाच्या घरी लवकरच 'वरात' घेऊन जाणार रणबीर कपूर!!