BMC : कोविड खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची भाजपाची तर ऑडिट करण्याची काँग्रेसची मागणी - कोरोना खर्चाची श्वेतपत्रिका
मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार सुरु आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपकडून आज स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली.
मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार सुरु आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपकडून आज स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. तर कोविडच्या नावाने केल्या जाणाऱ्या खर्चाचे ऑडिट करावे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. तर कोविडच्या नावाने करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
श्वेतपत्रिका काढा -
मुंबईत गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने कोविड सेंटर उभारले आहेत. त्यापैकी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कोविड सेंटरसाठी करण्यात आलेल्या ७७ आणि ५२ कोटींच्या खर्चाचे दोन प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. महापालिकेने १२७ कोटी रुपये खर्च करताना त्याचा तपशीलवार अहवाल दिलेला नाही. हा तपशील दिला जात नसल्याने नेमका खर्च कशावर होतो आहे हे कळत नसल्याने कोविडवर होणाऱ्या खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केली.
हे ही वाचा - Cruise Drug Case : जामिनासाठी आर्यन खानची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी
ऑडिट करा -
कोविडच्या नावाने गेल्या वर्षी २१०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यानंतर ४०० कोटी रुपये कोविड खर्चासाठी इतर विभागातून स्थानांतरित करण्यात आले. आतापर्यंत कोविडवर ४ हजार ७०० कोटी रक्कम खर्च करण्यात आली आहे. हा खर्च करताना तो कशावर खर्च करण्यात आला त्याबाबतचा कोणत्याही प्रकारचा तपशील देण्यात आलेला नाही. दहा रुपयांची वस्तू शंभर रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. यासाठी जो खर्च करण्यात आलेला आहे त्याचे महापालिकेच्या लेखा परीक्षाकडून ऑडिट करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
अहवाल द्यावा -
कोविडच्या काळात महापालिकेकडून नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा दिल्या जात आहे. कोविडच्या नावाने केल्या जाणाऱ्या खर्चावर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याआधीही करण्यात आलेल्या खर्चाबाबत तपशीलवार माहिती स्थायी समितीला सादर करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला देण्यात आले होते. स्थायी समितीमध्ये सतत कोविडच्या खर्चावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे कोविडवर करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.