मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या बरे होण्यामुळे जनतेत उत्साह निर्माण झाला आहे. परंतु, विरोधकांकडून सातत्याने आजारपणावर टीका करण्यात आली. हे टीकाकार नामर्द आहेत, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्बल दोन महिन्यांनी घराबाहेर पडले. विरोधकांनी यावरून राळ उठवण्यास सुरुवात केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकाकारांवर चौफेर हल्ला चढवला. मुख्यमंत्री घराबाहेर पडल्याने विरोधकांना चपराक बसली आहे. विरोधकांच्या मनातील घाण आता उघड झाली. आजारपणावर टीका करणारे नामर्द आहेत. भाजपमध्ये यापूर्वी अनेकजण आजारी होते. शिवसेनेने त्यावर कधीही भाष्य केले नाही. शिवसेनेची ती संस्कृती नाही, असा टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही राऊत यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला.
मरणोत्तर पुरस्कार थांबायला हवेत
देशात कोणालाही पद्म पुरस्कार देण्याचा पायंडा पडला आहे. केंद्रसरकार उठसूट कोणालाही पुरस्कार दिले जातात. वीर सावरकर यांना केंद्र सरकारने पुरस्कार द्यायला हवा होता. परंतु, सत्ता असतानाही सावरकर भारतरत्न पुरस्कारपासून वंचित आहेत, असा चिमटा राऊत यांनी भाजपला काढला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण पुरस्कार का दिला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच राज्यात जिवंत असताना टीका करायची आणि मृत्यूनंतर मरणोत्तर पुरस्कार द्यायचा, ही पध्दत रुढ झाली आहे. हे पुरस्कार आता बंद करायला हवेत, असेही राऊत म्हणाले.