आता राष्ट्रवादीचे लक्ष, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूक! - etv bharat marathi
शरद पवार यांनी मंगळवारी(12 ऑक्टोबर) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतून राज्याचा आढावा घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालावर शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी(12 ऑक्टोबर) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतून राज्याचा आढावा घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालावर शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आगामी काळामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. राज्यातील 36 जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांमध्ये देण्यात आली असून, या निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे निर्देश शरद पवारांनी दिले आहेत. तसेच निवडणुकांमध्येही स्थानिक पातळीचा विचार करूनच आघाडीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
हेही वाचा - Corona Update : राज्यात 2069 नवे रुग्ण, 43 रुग्णांचा मृत्यू
तसेच राज्यामध्ये 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीकडून "महाराष्ट्र बंद" ची हाक देण्यात आली होती. बंदला महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवाब मलिक यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या मानसिकतेतून बाहेर पडावे -
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान अद्यापही आपण मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आतातरी मुख्यमंत्र्यांच्या मानसिकतेतून बाहेर पडावे. राज्याचे विरोधी पक्षनेते हे पद देखील लहान नाही. या पदाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या जनतेची सेवा करावी.
केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर -
केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे. तसेच विरोधी पक्षाचे नेते व त्यांच्या जवळच्या लोकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्यासाठी या तपास यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला. तसेच या तपास यंत्रणेचा कितीही गैरवापर केला तरी पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते खंबीरपणे या परिस्थितीला सामोरे जाऊ, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी