मुंबई- केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार होणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला विस्तार असणार आहे, या विस्तारात मोदी सरकार नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. यावेळी महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असा अंदाज करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ व १९ जुनला भाजपमधील आघाडीच्या नेत्यांसह मंत्र्यांच्या दोन बैठकी घेतल्या आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि कर्नाटकचे भाजपचे नेते सुरेश अनगडी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याने रिक्त झालेल्या मंत्र्यांच्या जागा सरकारला भराव्या लागणार आहेत. महाराष्ट्रातून खासदार डॉ. हिना गावित, प्रीतम मुंडे, पुनम महाजन व खासदार राणे या नेत्यांची नावे केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
हेही वाचा-Goldprice सोन्यासह चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर
खासदार हिना गावित
- नंदुरबारमधील लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हिना गावित या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्या भाजपच्या आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. त्यांनी गेल्या ७० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मी साडेचार वर्षात करून दाखवले असल्याचे वक्तव्य नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत केले होते. लोकसभा निवडणुकीत गावीत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर प्रत्येक तालुक्यात सभांचा सपाटा लावला होता.
- भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी देत नंदुरबारसारख्या आदिवासी -दुर्गम भागातील लोकसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्वाची संधी दिली.
- तरूण खासदारांमध्ये अभ्यासू व विविध प्रश्न मांडून संसद रत्न पुरस्कार मिळविला.
- नंदुरबार लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा गड होता. सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून हिना गावित यांनी बाजी मारली आहे. दुसऱ्यावेळीस निवडणुकीत हिना गावित यांना ९५ हजार ६२९ मतांनी विजय मिळाला होता.
- कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मदत म्हणून नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक कोटींची मदत दिली आहे. तसेच आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनीही आपल्या एका महिन्याचे वेतन १ लाख रुपये कोरोनाच्या उपाययोजनांसाठी दिले आहे.
हेही वाचा-फादर स्टॅन स्वामी यांचे निधन, २० मिनिटांच्या चौकशीनंतर झाली होती अटक
नारायण राणे
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे राज्य राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचं नाव अग्रस्थानी असल्याचं सांगण्यात येते. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिल्याने भाजपाची ताकत कोकणामध्ये वाढेल अशी आशा केंद्रीय नेत्यांना आहे.
- यासोबतच नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. यासोबतच त्यांनी बराच काळ शिवसेनेसोबत कामही केल आहे. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आहे. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना जेरीस आणण्यासाठी भाजप नारायण राणे यांचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करू शकते.
- पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याचं काम नारायण राणे करू शकतात असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
- भाजपचे महाराष्ट्रामधील नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. यांच्या सोबतही नारायण राणे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील नारायण राणे यांच्यासाठी केंद्रात शब्द टाकू शकतील अशी आशा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांची यांच्या नावाची नेहमीच चर्चा राहिली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचे नाव दिल्ली दरबारी सुचवले तर त्यांच्या नावाची राज्यांमध्ये होणारी चर्चादेखील थांबेल. त्यामुळेदेखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नारायण राणे यांचे नाव सुचवले जाऊ शकते.
- एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा प्रवास करुन आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत.
हेही वाचा-मध्य प्रदेश : फोटोशुट करताना तीन मुले नदीत बुडाले; एकाला वाचविण्यात यश
प्रीतम मुंडे
- मुंडे कुटुंबियांचा राज्यसह मराठवाड्यामध्ये मोठा प्रभाव आहे.
- गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडे पाहिलं जाते.
- पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांच्याकडे केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी दिली तर, भविष्यात मराठवाड्यात भाजपला त्याचा फायदा होईल.
- पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राज्यात असलेला वाद सर्वश्रुत आहे. अशावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी दिल्यानं हा वाद देखील शमण्याची शक्यता असल्याने प्रीतम मुंडे यांच्या नावाचा विचार मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केला जाण्याची शक्यता आहे.
- प्रीतम मुंडे यांच्याकडे राज्यातील ओबीसी नेते म्हणून देखील पाहिले जाते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भाजपाच्या मागे राज्यातील मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज उभा राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
- डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवून खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर १ लाख ७८ हजार ९२० मतांनी दणदणीत विजय मिळवला होता
- राजकीय क्षेत्रासोबत प्रीतम मुंडे सामाजिक कामातही अग्रेसर असतात. गोपीनाथ मुंडे यांचे अपघातात निधन झाल्यानंतर प्रीतम मुंडे त्यांच्या जागेवर निवडून आल्या होत्या.
पूनम महाजन
- पूनम महाजन या व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून कॉंग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.
- जिल्हाधिकारी अथवा वनजमिनीच्या जागांवर असलेल्या घरांचे प्रश्न सुटले जात नव्हते, परंतु त्याचे निवारण केल्याचे लोकसभा निवडणूक प्रचारात म्हटले होते.
- उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी आपला गड राखला होता. तब्बल १ लाख २५ हजार ९६४ मतांची आघाडी घेत काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा दुसऱ्यांदा दारुण पराभव केला.
- अवघ्या दहा वर्षांत भाजपची कार्यकर्ती म्हणून पक्षनिष्ठा स्वीकारणाऱ्या पूनम महाजन यांनी त्याच पक्षात मुंबईची तरुण खासदार होण्याचा मान मिळवला.
- भारतीय जनता युवा मोर्चाची सूत्रे सांभाळली आहेत. १४ वर्षे भरतनाट्यम शिकून त्यांनी करिअरच्या दृष्टीने प्रोफेशनल पायलटचे लायसन्सही मिळविले आहे. ट्रिपल तलाक कायदा मंजूर करताना त्यांनी मोदी सरकारची संसेदत भक्कमपणे बाजू मांडल्याचे दिसून आले होते.