जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगेंनी बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन - Lok Sabha Election 2024
Published : Apr 19, 2024, 4:48 PM IST
नागपूर Lok Sabha Election 2024 : देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. आज पहिल्या टप्प्यात 21 राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली-चिमुर, भंडारा-गोंदिया या लोकसभेच्या 5 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. दरम्यान, आज जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगे यांनी नागपुरात मतदानचा हक्क बजावला. यासोबतच त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. ज्योती त्यांच्या कुटुंबासह नागपुरात राहतात. त्या एक अभिनेत्री तसंच मॉडेल आहेत. ज्योती आमगे यांचा जन्म 16 डिसेंबर 1993 रोजी नागपुरात झाला. ज्योती यांची उंची फक्त 2 फूट म्हणजेच 63 सेंटीमीटर आहे. त्यांची जगातील सर्वात लहान महिला म्हणून ओळख आहे. तसंच त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. ज्योती यांना ॲकॉन्ड्रोप्लासिया नावाचा हाडांमध्ये होणारा आजार आहे. त्यामुळं त्यांची उंची वाढू शकली नाही.