पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांचा पुन्हा एक व्हिडिओ समोर आलाय. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं वक्तव्य केलंय. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटलंय. याच पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकर यांच्या माफीची मागणी केली आहे. तसंच माफी न मागितल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशाराही खरात यांनी दिलाय.
नेमकं काय म्हणाले सचिन खरात? : सचिन खरात म्हणाले, "राहुल सोलापूरकर यांनी अत्यंत निषेधार्ह विधान केलंय. मी त्यांना सांगू इच्छितो की, जे वेद आहेत, त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकांनी लिहिलेलं आहे. तसंच आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला तुम्ही काहीही शिकवू नये. राज्य सरकारनं तत्काळ सोलापूरकर यांच्यावर कारवाई करावी. तसंच राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू," असा इशारा खरात यांनी दिलाय.
राहुल सोलापूरकर यांचं स्पष्टीकरण : या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्टवर राहुल सोलापूरकर म्हणाले, "माझ्या 23 नोव्हेंबरच्या ब्रॉडकास्टमधील दोन वाक्यं काढून मध्यंतरी प्रचंड गदारोळ माजला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबत बोलत असताना माझ्याकडून एक चुकीचं वाक्य बोललं गेलं होतं. त्याबाबत मी जाहीर माफी देखील मागितली होती. आज एक नवीन विषय समोर आलाय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देखील मी जे काही बोललो त्यातील दोन वाक्य काढण्यात आली आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. गेली 40 वर्ष समाज जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज याप्रमाणे अनेक थोर पुरुषांवर मी जगभर व्याख्यानं दिली. त्यांचे आदर्श घेऊनच मी पुढं गेलोय. पण तरीही असं का केलं जातय, याविषयी मी अनभिज्ञ आहे. ज्या ज्या महामानवांना समोर ठेवून मी जगत असतो, त्यांच्याविषयी वाईट वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. पण जर कोणाला वाटत असेल तर त्यांची मी माफी मागतो.”
हेही वाचा -