पुढील 5 वर्षात नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होईल- चंद्रशेखर बावनकुळे - REPUBLIC DAY 2025
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 26, 2025, 1:38 PM IST
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2025) नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परेडचं निरीक्षण केलं. यावेळी बावनकुळे म्हणाले की, "आज संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी हा सोहळा दुहेरी आनंदोत्सव घेऊन आलाय. कारण, यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प केलाय. भारत जगातील मोठी आर्थिक महाशक्ती होण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाला सर्वांनी हातभार लावण्याचं आवाहन त्यांनी केलंय. अनेक आव्हानं आपल्यापुढं आहेत. मात्र, 'सबका साथ, सबका विकास' या धोरणाचा अवलंब करून भारताला विकसित राष्ट्र म्हणून आपल्याला पुढं जायचंय. तसंच पुढील 5 वर्षात नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होईल," असंही ते म्हणाले.