प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग, मानवी साखळीनं राबवलं 'माझी शाळा, सुंदर शाळा अभियान'
Published : Jan 26, 2024, 1:50 PM IST
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील सह्याद्री संस्थेचे डी. के. मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. शाळेविषयी उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, या हेतूनं विद्यार्थ्यांनी अनोखा प्रयोग सादर केला. स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी व आनंददायी वातावरण तयार व्हावे, यासाठी राज्य सरकारनं ''मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'' अभियान चालू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर रांगोळी व विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीने 1381 विद्यार्थ्यांची रचना शाळेची प्रतिकृती काढून तयार करण्यात आली. क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचं महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचं महत्त्व तसंच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणं, हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. प्राचार्य साहेबराव कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ही संकल्पना विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसबे यांनी साकारली. प्रा. भिमराज काकड, भारत सोनवणे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. रांगोळी काढण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वैभव थोरात, अविष्कार थोरात, जागृती थोरात यांनी सहकार्य केलं.