भाजपा दहशतवादी पक्ष, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा; निखिल वागळे यांची मागणी - निखिल वागळे हल्ला पुणे
Published : Feb 10, 2024, 11:17 AM IST
पुणे Nikhil Wagle Attack : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झालीय. पुण्यात राष्ट्रसेवा दल येथे निखिल वागळे यांच्या कार्यक्रमाला जोरदार विरोध करण्यात आला होता. यानंतर निखिल वागळे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना त्यांची गाडी फोडण्यात आली. यावर निखिल वागळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, "मी दररोज भाजपावर जी टीका करतो त्याचा भाजपानं बदला घेतलाय. भाजपा हा दहशतवादी पक्ष आहे."
गृहमंत्र्यांचा मागितला राजीनामा : निर्भय सभा संपल्यावर निखिल वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांनी भूमिका मांडली. सकाळपासून पोलिसांनी आम्हाला 4 तास नजर कैदेत ठेवलं. हल्ला झाल्यानंतर पोलीस आले. आमच्यावर 4 ते 5 ठिकाणी हल्ला करण्यात आला. हल्ला झाला असला तरी आम्ही घाबरलेलो नाहीत. हा भ्याड हल्ला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. आमचे कार्यकर्ते आले नसते तर आम्ही वाचलो नसतो. त्यांना आम्हाला ठार मारायचे होतं, असं निखिल वागळे यांनी म्हटलंय.