कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नियुक्त 12 आमदारांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सुनील मोदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. याचिका फेटाळल्यानं हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का मानला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 6 नोव्हेंबर 2020 रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवण्यात आली होती. मात्र, अडीच वर्षानंतर सत्ता बदल झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं नव्या आमदारांची यादी पाठवली. मात्र ही यादी बेकायदेशीर आहे, असा आरोप महाविकास आघाडीनं केला होता. दिलेल्या यादीनुसार 12 आमदार नियुक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती बोरकर आणि उपाध्याय यांनी निकालाचं वाचन केलं. सुनील मोदी यांची याचिका कोर्टानं फेटाळली यानंतर माध्यमांशी बोलताना आता आमचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला असून याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सुनील मोदी म्हणाले.
उद्धव ठाकरेंना धक्का महायुतीला दिलासा : उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर राज्यातील महायुतीला दिलासा मिळाल्यानं 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सांगितलं. आता 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा -