पुणे : दिल्लीत पार पडलेल्या पहिल्या खो-खो वर्ल्डकप (Kho Kho World Cup 2025) स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत भारतीय पुरुष आणि महिला संघानं विजेतेपद पटकावलं. या विजयी संघातील खेळाडूंचं पुण्यात आगमन झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच खेळाडूंची विजयी रॅलीही काढण्यात आली. कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ते वाईकर सदन, चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ परिसरात खेळाडूंची वाजत गाजत रॅली काढण्यात आली. यावेळी या खेळाडूंनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आरती केली.
दिल्ली इथं पार पडलेल्या पहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं विजेतेपद पटकावलंय. या दोन्ही संघात पुण्यातील कसबा मतदार संघाचे पाच खेळाडू होते. यात पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले, प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला प्रशिक्षक प्राची वाईकर यांचा समावेश होता.
हेमंत रासने म्हणाले 'हा पुणेकरांसाठी अभिमानाचा क्षण' : यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार हेमंत रासने म्हणाले की, "भारतात पहिल्यांदा खो-खो वर्ल्डकप झाला आणि या स्पर्धेत आपल्या भारतीय पुरुष आणि महिला संघानं विजय प्राप्त केलाय. या पुरुष संघात आणि महिला संघात कसबा मतदारसंघाचे पाच खेळाडू असून पुण्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. पुढील काळात या खेळाडूंना जे काही पाहिजे असेल, ते देण्याचं काम मी करणार आहे." तसंच सरकारकडून प्रत्येक खेळाडूला 2 कोटी रुपये आणि क्लास वन नोकरी जाहीर झाली आहे, त्याबाबत सरकारचं आभार, असंही ते म्हणाले.
काय म्हणाला प्रतीक वाईकर ? : यावेळी बोलताना कर्णधार प्रतीक वाईकर म्हणाला की, "माझ्यावर कर्णधार म्हणून काहीच दडपण नव्हतं. पण पहिलाच वर्ल्डकप भारतात होत असल्यानं जबाबदारी नक्कीच होती. पहिल्या सामन्यात आम्ही प्रेशरमध्ये होतो, पण पुढं प्रेशर कमी केलं आणि वर्ल्डकप जिंकला. नेपाळ आणि आफ्रिका हे संघ तुल्यबळ होते. पण फायनलमध्ये खेळताना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आणि खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे आम्ही वर्ल्डकप जिंकलाय."
हेही वाचा -