खेळण्याकरिता गेलेल्या मुलाचा खड्डयात पडून चिमुकल्याचा मृत्यू
Published : 5 hours ago
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात इमारतीच्या बांधकामसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोपरखैरणे येथील सेक्टर 5 मध्ये ही घटना आहे. अंकित थांगून्ना असं मुलाचं नाव असून तो इयत्ता दुसरीत शिकत होता. अंकित हा खेळण्यासाठी जातो सांगून घरातून बाहेर गेला होता. पालिका शाळेच्या बाजूला सुरू असलेल्या निर्माणाधिन इमारतीच्या बांधकाम साईटवर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे. सदर बांधकाम ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं कोणताही सुरक्षा गेट, सुरक्षा रक्षक नसल्यानं याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केलाय. तसंच या घटनेमुळं बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणीही परिसरातील नागरिक करत आहेत.