पुणे : युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम तर्फे प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा जगभरातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार माधव गाडगीळ यांना जाहीर झाल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया : पुरस्कार जाहीर झाल्याबाबत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, "गेली अनेक दशकं पर्यावरणाच्या तसंच निसर्गाच्या आणि लोकांच्या अधिकारांच्याबाबत काहीतरी पावलं ही उचलली पाहिजेत. यासाठी एक पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून मी माझी भूमिका मांडली. तसंच पश्चिम घाट परिसरातील अहवाल देखील लिहिला. परंतु, 2011 नंतर तो लपविण्याचा प्रयत्न झाला असला तरी, 13 वर्षांनी देखील लोकांचं लक्ष त्याकडं वेधलं जात आहे. देशातील वेगवेगळ्या विधिमंडळात देखील यावर चर्चा होऊन त्याच्या तरतुदी अंमलात आणल्या पाहिजे, यासाठी बोललं जात आहे. हे माझ्या दृष्टीनं खूपच उत्साह देणारं आहे." तसंच हा पुरस्कार मला देण्यात येणार आहे हे मला पाच महिन्यांपूर्वीच सांगण्यात आलं होतं. पर्यावरण संवर्धन करायचं असेल तर लोकचळवळ देश स्तरावर उभारली पाहिजे, अशी भावना देखील गाडगीळ यांनी व्यक्त केली.
कधी झाली 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' स्थापना ? : 2005 मध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आणि नागरी समाजातील उत्कृष्ट पर्यावरणीय नेत्यांना ओळखण्यासाठी वार्षिक पुरस्कार कार्यक्रम म्हणून 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ'ची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत 122 जणांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यात माधव गाडगीळ हे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
हेही वाचा -