मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत अभिनीत 'क्वीन' आजही लोकांना खूप पसंत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगलाच गाजला होता. 'क्वीन' चित्रपटामध्ये काम केल्यानंतर कंगनाला 'क्वीन ऑफ बॉलिवूड'चा टॅग मिळाला होता. आता अनेकजण 'क्वीन' चित्रपटाच्या सीक्वेलची मागणी करत आहेत. आता दिग्दर्शक विकास बहल यांनी देखील या चित्रपटाच्या सीक्वेलला दुजोरा दिला आहे. 'क्वीन'च्या सीक्वेलबद्दलची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. विकास बहल यांनी बॉलिवूडमध्ये 'चिल्लर पार्टी', 'क्वीन', 'सुपर 30' आणि 'शैतान' यासारखे चित्रपट केले आहेत. 'क्वीन' चित्रपटामधील कंगनाचं राणी पात्र अनेकांना पसंत पडलं होतं.
स्क्रिप्टचे काम पूर्ण झालं : अलीकडेच एका मुलाखतीत, विकास बहल यांनी सांगितलं होतं की,'आम्ही काही काळापासून 'क्वीन 2'वर काम करत आहोत.' दरम्यान कंगना राणौत तिची पुन्हा भूमिका पडद्यावर साकारणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर 'हो' लिहिलं होतं. विकास यांनी चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल खुलासा करत पुढं म्हटलं होतं, 'क्वीन रिलीज होऊन दहा वर्षे झाली आहेत, आता लोक मला 'क्वीन 2' बद्दल विचारत असतात. मला असं वाटतं की, 'क्वीन' हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला होता.' मला सांगायला आनंद होत आहे की, आम्ही आमची कहाणी लिहून पूर्ण केली आहे. त्यामुळे त्याचा सीक्वेल बनवला जाणार आहे.'
विकास बहलनं 'क्वीन' चित्रपटाबद्दल केला खुलासा : यानंतर चित्रपट निर्मात्यानं यावर जोर दिला की, सीक्वल घाईत बनवला जाऊ शकत नाही, कारण स्क्रिप्टनं ओरिजिनल चित्रपटाला न्याय द्यावा अशी त्याची इच्छा होती. त्यानंतर विकास यांनी हसताना सांगितलं की, 'चित्रपट चांगला असेल, आम्ही चांगली नक्कीच कमाई करू, पण चांगली कहाणी असणं खूप गरजेचं आहे.' दरम्यान 2014मध्ये प्रदर्शित झालेला 'क्वीन' हा चित्रपट 23 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 95.04 कोटीची कमाई केली होती. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटानं अनेक पुरस्कार पटकावले आहेत. याशिवाय या चित्रपटासाठी कंगनाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'क्वीन' चित्रपटामध्ये कंगना राणौतबरोबर राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसला होता.
हेही वाचा :