पुणे : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात बनावट औषधं पुरवण्यात आल्याचा प्रकार घडला होता. खबरदारी म्हणून ठेकेदाराकडून पुण्यातील ससून रुग्णालयाला जी औषधं पुरवण्यात आली होती, त्याचा वापर थांबविण्यात आला आहे. तसंच सध्या उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची चाचणी एफडीएकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती, ससून हॉस्पिटलचे डीन एकनाथ पवार यांनी दिली.
औषधांचा वापर थांबवण्यात आला : याबाबत डीन डॉ. एकनाथ पवार म्हणाले, "आमच्या वरिष्ठांच्याबरोबर एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये जे निर्देश देण्यात आले होते त्यात काही औषधांच्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्या होत्या. यात ज्या पाच कंपन्या आहेत त्यांची औषधं बनावट असल्याचं समोर आलं होतं. ज्या कंपनीच्या विरोधात तक्रार झाली आहे अशा कुठल्याही कंपनीची औषधं आपल्याकडे खरेदी करण्यात आली नाहीत. परंतु, या पाच कंपन्यांच्या वितरकांविरोधात देखील तक्रार प्राप्त करण्यात आली असल्यानं, खबरदारीचा उपाय म्हणून या ठेकेदाराकडून जी औषधे ससून हॉस्पिटलने खरेदी केली आहेत. त्या औषधांचा वापर थांबवण्यात आला आहे." तसंच एफडीएला पत्र देऊन ही औषधं तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
कोणती औषधे वापरण्यात आली? : ठेकेदाराकडून ससून हॉस्पिटलला डायक्लोफिनॅक, मीडिआझोलम, कॅल्शियम, डेक्सामिथसोन आणि मिझोप्रोस्टॉल ही औषधे पुरविली. ही औषधे याआधी वापरण्यात आली आहेत. उर्वरित औषधांपैकी डायक्लोफिनॅक (४०४० गोळ्या) मीडिआझोलमच्या (१४४०) कॅल्शियम (१२०), डेक्सामिथसोन (५ हजार) आणि मिसोप्रोस्टॉलचे (७,५००) अशी औषधे शिल्लक आहेत. मात्र, आता याचा पुरवठा बंद करण्यात आला असून ती औषधे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.
हेही वाचा -
- 'ससून'चा आणखी एक कारनामा उघड; बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी दिलं सोडून, डॉक्टर निलंबित - Sassoon Hospital Pune
- ससूनचा पदभार स्वीकारताच डॉ चंद्रकांत म्हस्के 'ॲक्शन मोडवर'; म्हणाले... - pune hit and run case
- Sassoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा तपास सीआयडीकडं सोपवा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी