शपथविधीसाठी खास तयारी! पुण्यातून येणार विशेष पगडी, वैशिष्ट्य काय? - MAHAYUTI SWEARING IN CEREMONY
Published : Dec 5, 2024, 10:19 AM IST
पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आज (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी बनवली आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुरुडकर झेंडेवाले म्हणाले की, "महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मागील आठवड्यापासूनच विविध पगड्यांची नोंद करण्यात आली आहे. यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. या पगडीचं वैशिष्ट्य असं की, संत तुकाराम महाराज हे ही केशरी तुकाराम पगडी घालायचे अगदी तशीच आहे. अखंड कापडात ही पगडी बनविण्यात आली आहे. तसंच ही पगडी बनवतांना कुठल्याही कृत्रिम साहित्याचा वापर करण्यात आलेला नाही. अगदी पारंपरिक पद्धतीनं ही पगडी तयार करण्यात आली आहे." तसंच काहीजणांसाठी गुलाबी पगडीदेखील तयार करण्यात आल्याचं मुरुडकर झेंडेवाले यांनी सांगितलं.