अकोला : मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेला आपला जीव (woman died in honey bee attack) गमवावा लागलाय. ही घटना बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे घडली. रेश्मा आतिश पवार (वय-30) असं मृत महिलेचं नाव असून या घटनेत सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं? : काजळेश्वर येथे आतिष पवार यांच्या शेतातील हरभरा सोंगणी अगोदर पूजा आयोजित करण्यात आली होती. पूजा सुरू असताना याठिकाणी अगरबत्ती लावण्यात आली. अगरबत्तीच्या धुरामुळं शेजारी असलेल्या झाडावरील आग्या मोहाचं पोळ उठल्यानं मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात रेश्मा पवार गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तत्काळ अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात इतर सहा जण जखमी झाले आहेत. यात दोन महिला, एक पुरुष आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, रेश्मा पवार यांच्या पश्चात दोन लहान मुली, पती असा परिवार आहे. चिमुकल्या मुली पोरक्या झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पांडवगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला : काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना वाई तालुक्यात घडली होती. या घटनेत पांडवगडावर मधमाशांनी पर्यटकांवर जोरदार हल्ला चढवल्यानं इंदापुरातील (जि. पुणे) सहा जण गंभीर जखमी झाले होते. तर त्यातील दोघंजण बेशुद्ध पडले होते. त्यानंतर सर्व जखमींना गडावरून खाली आणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोपाळ अशोक दंडवते, निखिल मगनदास क्षीरसागर, गोपाळ राजाभाऊ आवटी, चैतन्य विवेक देवळे, आल्हाद विलास सदावर्ते आणि संतोष जाफेर, अशी जखमींची नावं आहेत.
हेही वाचा -