छत्रपती संभाजीनगर - ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपमधून घरीच खाद्य पदार्थ मागविण्याचं प्रमाण राज्यभरात वाढलं आहे. असे असले तरी घरपोच सेवा देणाऱ्या रायडरला (फूड डिलिव्हरी बॉय) योग्य मोबदला मिळत नाही, असा दावा करण्यात येत आहे. याचमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 300 फूड डिलिव्हरी बॉय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. शुक्रवार दुपारपासून कामबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जिल्ह्यातील फूड डिलिव्हरी बॉय आंदोलकांची भेट घेतली आहे. राज्यभर अशीच परिस्थिती असून राज्य सरकारनं या लोकांसाठी योग्य धोरण करायला हवे. आम्ही अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहोत. हजारो लोकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला.
महत्त्वाचे संक्षिप्त मुद्दे
|
फूड डिलिव्हरी अॅपमधून सेवा देणाऱ्यांनी केलं कामबंद- फूड डिलिव्हरी बॉयच्या माहितीनुसार प्रत्येक आठवड्याला कंपनीकडून सेवा शुल्क बदलण्यात येत आहे. त्यात 35 ऑर्डर पूर्ण केल्यास त्याचे पैसे देण्यात येतील, असे सांगण्यात आलं. काम वाढवून त्या दरानं पैसे वाढले नाहीत. उलट देण्यात आलेलं लक्ष्य पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे फूड डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्या तरुणांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.
फूड डिलिव्हरी बॉयला एवढा होता मोबदला
- 5 ऑर्डरला 250 रुपये
- 11 ऑर्डरला 650 रुपये
- 15 ऑर्डरला 925 रुपये
- 19 ऑर्डरला 1225 रुपये
- 22 ऑर्डरला 1450 रुपये
- 25 ऑर्डरला 1700 रुपये
- फूड डिलिव्हरी बॉयच्या माहितीनुसार ऑर्डर जास्त आणि पैसे कमी असे धोरण ठेवण्यात आलं आहे. 35 ऑर्डरला 2350 रुपये करण्यात आले आहेत. कामबंद केल्यावर काही फूड डिलिव्हरी बॉयला धमकी येत असल्याचा त्यांनी दावा केला.
राज्यात अशीच परिस्थिती आहे. यांचा आवाज कोणी उचलणार नाही, असं वाटत असेल तर असं होणार नाही. काँग्रेस पक्ष हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार आहे -काँग्रेस प्रवक्ते, अतुल लोंढे
अनेक वेळा बदलले दर- गेल्या काही महिन्यांमध्ये फूड डिलिव्हरी अॅपकडून कर्मचाऱ्यांकरिता अनेक वेळा दर बदलण्यात आले. प्रत्येक वेळी तात्पुरते बदल असल्याचं सांगण्यात आलं. काही दिवसात दर योग्य वाटले नाही तर बदलू, असे आश्वासन देण्यात आलं. मात्र, काही बदल करण्यात आलेच नाहीत. काम अधिक असून मोबदला कमी अशी परिस्थिती होत असल्याचं फूड डिलिव्हरी बॉयनं सांगितलं.
नीलम गोऱ्हे यांच्याकडून अपेक्षित नाही- विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तिकीटवाटपाकरिता शिवसेनेकडून (यूबीटी) मर्सिडिज घेण्यात आल्याचा दावा केला होता. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते लोंढे म्हणाले, "दोन मर्सिडिजचा मुद्दा चर्चेत आला आहे. खऱ्या अर्थानं राजकारण करायचं असेल तर तिथे प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. पक्षांतर केल्यानंतर यांना स्क्रिप्ट दिल्या जातात. नीलम गोऱ्हे यांच्याकडून हे अपेक्षित नाही, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी झाली आहे. आता महाराष्ट्रात गँगवॉर सुरू आहे. फडणवीस यांना या गोष्टी दिसत नाही का? एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय फडणवीस फिरवत आहेत, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.
हेही वाचा-