"महाराष्ट्रात पुन्हा आपलंच सरकार येणार..." खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाम विश्वास - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Oct 8, 2024, 10:55 PM IST
बीड : राज्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालीय. बीडमध्ये काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगाव आणि परळी येथे सभा घेतली. त्यानंतर आज (8 ऑक्टोबर) बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख अनिल जगताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकार आपलंच असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये महिन्याला मिळात आहेत. त्यामुळं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा दिला. त्यामुळं विरोधकांच्या पोटामध्ये दुखत आहे. अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री आहेत. 18-18 तास मुख्यमंत्री काम करत आहेत. योजनांच्या प्रत्येकापर्यंत पोहोचाव्यात याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. येणार सरकार जे आहे ते आपलंच असणार आहे," असा ठाम विश्वास श्रीकांत शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.
बीड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील दावा केलाय. त्यातच आज बीड विधानसभा मतदारसंघातील ही जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याचं श्रीकांत शिंदेंनी सांगितलं. त्यामुळं आता ही जागा नेमकी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.