मुसळधार पावसानं 'मुंबईची तुंबई', राज्य सरकारविरोधात काँग्रेसचं आसूड आंदोलन - Congress Asud andolan
Published : Jul 21, 2024, 1:41 PM IST
मुंबई : मुंबई काँग्रेसतर्फे कुलाबा विधानसभा क्षेत्रात रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्येकडं लक्ष वेधत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसचे लीगल सेलचे प्रमुख रवी प्रकाश जाधव यांनी केलं. यावेळेस त्यांनी रस्त्यांवर रिंगण आखून रस्त्यावर पडलेले खड्डे हायलाईट केले. तसंच महानगरपालिकेच्या कारभारावरतीदेखील टीका केली. महानगरपालिकेनं यावेळी खड्डे बुजवले नाहीत, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून राज्यसरकारवर आसूड उगारण्यात आला. आसूड आंदोलनाविषयी माहिती देताना रवी जाधव म्हणाले, " मुंबई शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळं मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र मुंबईतील सगळ्यात रस्त्यावर पाहायला मिळतंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या जवळील हा मुख्य रस्ता आहे. या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यावरून जाताना दुचाकीस्वार पडल्याच्या घटना समोर आल्या आहे. मुंबईतील विकास कामं मार्गी लावावे, तसंच रस्त्यांवरील खड्डे, तुंबलेल्या गटारी, स्थानिक प्रश्नाकडं सरकारनं, मुंबई महापालिकेनं, स्थानिक आमदारांनी लक्ष देऊन मुंबईकरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करत आहे."