चेन्नई Samsung workers strike :श्रीपेरुंबदुर येथील सॅमसंग इंडियाच्या प्लांटमधील 1 हजारांहून अधिक कामगारांचा संप तिसऱ्या आठवड्यात देखील सुरू आहे. दक्षिण कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनं शुक्रवारी सांगितलं, की कंपनी व्यवस्थापन कामगारांशी थेट चर्चा करण्यास तयार आहे.
कामगारांना सर्व वैधानिक लाभ : मद्रास उच्च न्यायालयात तसेच कांचीपुरम जिल्हा न्यायालयात कंपनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॅमसंग इंडियाच्या वकिलांनी एका निवेदनात म्हटलं की, तामिळनाडूतील कारखान्यातील कामगारांना सर्व वैधानिक लाभ मिळतात. त्यांचे वेतन सरकारनं ठरवून दिलेल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. "मला तुम्हाला कळवायचं आहे की सध्या सुरू असलेला संप बेकायदेशीर आहे. कारण कामगारांनी केलेल्या मागण्यांबाबत चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. कामगार संघटना आजपर्यंत नोंदणीकृत नाहीय". त्यांनी पुढं सांगितलं की, अशा परिस्थितीत सॅमसंग इंडियाच्या व्यवस्थापनानं संप करणाऱ्या कामगारांवर योग्य ती कारवाई करणं योग्य आहे.
कामगारांशी थेट वाटाघाटी :“तथापि, सॅमसंग इंडिया व्यवस्थापनानं संयम बाळगला आहे. तसंच विवादाच्या सौहार्दपूर्ण निराकरणासाठी कामगारांशी थेट वाटाघाटी करण्यास तयार आहे. सॅमसंग इंडिया व्यवस्थापन कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामगारांसोबत चर्चा करण्यीची तयारी आहे,”असं कंपनीचे वकील म्हणाले.
उत्पादनाला बसला :वेतनवाढ, युनियनची मान्यता, 8 तास काम यासह आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी कामगार 9 सप्टेंबरपासून संपावर आहेत. कारखान्यातील संपाचा फटका टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनाला बसला आहे.