पुणे : पुण्यात घरगुती वादातून पतीनं पत्नीची अत्यंत निर्घृण हत्या (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. इतकंच नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर त्यानं तिचा व्हिडिओही काढला. ही घटना बुधवारी (22 जाने.) पुण्यातील चंदननगर परिसरात घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते याला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून कार्यरत असून खराडी परिसरात तो आपल्या कुटुंबासह राहत होता. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन नेहमीच भांडणं होत होती. घटना घडली त्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला होता. मात्र, हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात शिवदासनं आपल्या मुलासमोरच कात्रीनं गळ्यावर वार करुन आपल्या पत्नीचा खून केला. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यानंतर त्यानं घटनास्थळाचा व्हिडिओ चित्रित करत आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली. ज्योती शिवदास गीते असं मृत पत्नीचं नाव आहे. याप्रकरणी मृत ज्योतीच्या बहिणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. तर या प्रकरणी पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.
पोलीस जबाबात काय म्हणाला आरोपी? : 2016 मध्ये ज्योती (वय 27) आणि शिवदास गीते (वय 37) यांचा विवाह झाला. या दाम्पत्याला 5 वर्षाचा अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. ज्योती घरीच कपडे शिवण्याचं तसंच धुणे भांड्याची कामं करत होती. तर शिवदास गीते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे स्टेनो म्हणून कार्यरत आहे. 15 जानेवारी रोजी झालेल्या एका परीक्षेत शिवदास नापास झाल्यानं त्याला कामावरुन कमी करण्यात आलं होतं. ही परीक्षा परत द्या, असं ज्योती अनेकवेळा शिवदासला म्हणाली. 22 जानेवारी रोजी संध्याकाळी पावणे 7 वाजता ज्योती पुन्हा आपल्या पतीला परीक्षेसंदर्भात बोलली. याचा राग आल्यानं शिवदास यानं शिलाई मशीनवर वापरण्यात येणाऱ्या कात्रीनं त्यांच्या मुलासमोर ज्योतीची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नाहीतर त्यानं खून केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योतीचा व्हिडिओ सुद्धा काढला. यानंतर शिवदासनं स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हा सगळा घटनाक्रम सांगितला.
व्हिडिओमध्ये काय म्हणाला शिवदास : ज्योतीची हत्या केल्यानंतर शिवदासनं एक व्हिडिओ काढला. त्यात तो म्हणतो, "ही माझ्यासाठी लक्ष्मी होती. पण तिची लक्षणं बरी नव्हती. स्वत:च्या संरक्षणासाठी माझ्यावर इतकं वाईट करण्याची वेळ आली. ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती. तिचे भाऊ, माझे मेव्हणे यांनी पण मला मारण्याचा प्रयत्न केला. ही एका मुलाची आई आहे. पण माझ्या मुलाच्या भविष्यासाठी आणि स्वत:साठी मी हिला मारलं. मी वाईट हेतूनं कधीच काही केलं नाही. मी हिला सांभाळलं असतं पण स्वत:च्या रक्षणासाठी मला हे करावं लागलं. मी आतापर्यंत कोणताही गुन्हा केलेला नाही. पण हिच्या माहेरची लोकं गुंड प्रवृत्तीची आहेत." याबरोबरच इतरही अनेक गोष्टी शिवदासनं या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत.
हेही वाचा -