सोलापूर Rajendra Raut On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीनं महाराष्ट्र राज्य ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता सोलापुरातील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्र राज्याची परिस्थिती मणिपूर सारखी होते की काय अशी भीती व्यक्त केली आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललीय. त्यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ताबडतोब विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणीही पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र राऊत यांनी केली आहे.
राज्यातील मराठा आमदार आणि इतर आमदारांचे म्हणणे जनते समोर येऊ द्या : अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी रविवारी (8 सप्टेंबर) दुपारी बार्शीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, "विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ताबडतोब विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा आमदार आणि इतर समाजाच्या आमदारांचं म्हणणं लेखी स्वरूपात घ्यावं. तसंच महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, मराठा आमदारांच्या मनात काय आहे, ते सर्व राज्याला कळू द्या. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं किंवा नाही याबद्दल त्यांचं म्हणणं लेखी स्वरूपात घ्या आणि राज्यातील जनतेला कळू द्या", अशी भूमिका राजेंद्र राऊत यांनी स्पष्टपणे मांडली.