नाशिक : माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी मुलगा तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री कुमारस्वामी तसंच कुटुंबातील इतर सदस्यांसह शनिवारी (21 डिसेंबर) नाशिक येथील पंचवटीतील श्री काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर येथे महादेव मंदिरात पूजा करून दर्शन घेतलं. यांच्या सोबत कर्नाटकमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात जामिनावर असणारा दुसरा मुलगा एच.डी. रेवण्णाही उपस्थित होता.
त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा : अध्यात्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. तसंच नाशिक हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे वास्तव्यास होते असं सांगितलं जातं. त्यामुळं नाशिकला वेगळं महत्व आहे. दरम्यान, भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कुटुंबातील इतर सदस्यांसह नाशिक येथील पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात पूजा करून दर्शन घेतलं. कुमारस्वामी हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर श्रीरामाच्या दर्शनाला येणार असल्याचं देवेगौडा यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी दर्शन घेऊन संकल्पपूजन केल्याची माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली. त्यानंतर देवेगौडा यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी संस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्र्यंबकेश्वर मंदिरात त्यांनी अर्धा तास पूजाविधी केली. यावेळी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या सोबत त्यांचे दोन्ही मुलगे, नातू कन्नड अभिनेता निखील कुमारस्वामी, त्यांची पत्नी रेवती, पणतू अव्यांगदेव उपस्थित होते.
पेशवेकालीन मंदिर : श्री काळाराम मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची 'पर्णकुटी' होती. राम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचं बांधकाम करण्याची आज्ञा केली होती. याच काळात ओढेकर यांना 'तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा' असा रामाचा स्वप्नदृष्टांत झाल्याचं बोललं जातं. काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होतं. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळालेल्या आहेत.
हेही वाचा