चंदीगड : मोहालीच्या सोहाना गावात एक बहुमजली इमारत अचानक कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीत एक जिम चालवली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. एनडीआरएफच्या टीमकडून घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.
एनडीआरएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर 77 मधील एका शेजारील इमारतीच्या तळघरात विनापरवानगी खोदकाम केल्यामुळे जिमचे बांधकाम कोसळले. यावेळी पाच लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. इमारत मालक परविंदर सिंग आणि गगनदीप सिंग यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक पारीक यांनी माध्यमांना दिली. ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रत्येकाला बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न आहेत. सर्व लोकांची सुटका होईपर्यंत चोवीस तास मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले. बचावमोहीमेसाठी सर्व आवश्यक उपकरणे आणि मशिनरीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
चार मजली इमारतीशेजारी असलेल्या दुसऱ्या इमारतीत खोदकाम सुरू होते. त्यामुळे इमारत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बहुमजली इमारत कोसळल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी एक्स मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले, "मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रार्थना करत आहे. दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल".
ढिगाऱ्यातून बाहेर काढला मृतदेह- इमारतीजवळ दुर्घटनेतील व्यक्तींच्या नातेवाईकांसह बघ्यांनी गर्दी केली आहे. एनडीआरएफनं जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. एनडीआरएफच्या कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार 22 वर्षाच्या तरुणीची सुटका करण्यात होती. मात्र, उपचार सुरू असताना तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. इमारत कोसळल्यानंतर बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. ढिगाऱ्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. ढिगारा हटवण्यात येत असून पोलीस अधिकारीही घटनास्थळी आहेत.
प्रशासनाकडून हलगर्जीपणा?- मोहालीतील दुर्घटनेनंतर जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांनी निवदेन देत प्रशासनाकडं मागणी केली आहे. या अपघाताचे कारण काय? याला जबाबदार कोण? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. प्रशानाकडून अपघातातील आरोपींवर काय कारवाई होणार, याकडं स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा-