अहमदनगर Watermelon Success Story : कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील उक्कडगाव येथील शंकर निकम (Shankar Nikam) या तरुण शेतकऱ्यानं नापीक जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं पाण्याची आणि औषधाची योग्य फवारणी करून, 30 गुंठ्यात कलिंगडची (Watermelon) लागवड करून लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. तसेच या कलिंगडला पश्चिम बंगालमधून मागणी येत आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं कलिंगड आता थेट ममता दीदींच्या राज्यात जाणार आहे.
दोन लाख 72 हजारांचं उत्पन्न : अहमदनगर जिल्ह्यातील शंकर निकम या तरुण शेतकऱ्यानं नापीक समजल्या जाणाऱ्या जमिनीवर प्रती रोप दोन रुपये साठ पैसे, या प्रमाणं एकूण पाच हजार चारशे रोपांची लागवड केली होती. ठिबक सिंचनचा वापर करत कलिंगडाला पाणी दिलं. यामुळं कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं. तसेच पिकाला आवश्यक खते, औषधांची फवारणी केली. जवळपास 2 महिन्यांनी हे कलिंगड तोडण्यास आले. सर्वसाधारणपणे एक कलिंगड पाच ते सहा किलो वजनाचे आहे. बाजारात प्रती किलो साडे बारा रुपये असा भाव या कलिंगडला मिळाला. एकूण 23 टन कलिंगडाचं दोन लाख 72 हजार रुपये मिळाले. खर्च जाता एक लाख 80 हजार रुपये एवढा नफा मिळालाय.