शिर्डी : “राष्ट्रवादीचं दोन दिवसीय अधिवेशन सुरू झालंय. अधिवेशनाचं स्वरुप काय असेल? कुठल्या मुद्यांवर चर्चा होणार? यावर प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राजकीय पक्ष सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काही ना काही दिशा, धोरणच्या सूचना करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड वर्षांपूर्वी अनेक घडामोडी घडल्या. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं नाही. पण त्यानंतर विधानसभेला चांगलं यश मिळालं”. दरम्यान, आज नाराज असलेल्या छगन भुजबळांनी या अधिवेशनाला हजेरी लावली.
निवडणुकांसाठी आमचा पक्ष सज्ज : “विधानसभेनंतर महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती अशा विविध संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मुंबई, दिल्लीशिवाय गाव, जिल्हा नियोजनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या निवडणुकांसाठी आमचा पक्ष सज्ज राहिला पाहिजे. उद्याची दिशा काय राहील यावर दोन दिवस चर्चा होईल” असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
भुजबळ आणि मी एका परिवारात काम करतो : “छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ही घरातली गोष्ट आहे. शुक्रवारी मुंबईत माझी आणि भुजबळ यांची भेट झाली. काही गोष्टी असतात. पण त्यांची नाराजी टोकाची नाही. भुजबळ पक्षाचे आधारस्तंभ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच त्यांचं मार्गदर्श मिळेल याची मला खात्री आहे” असं प्रफुल पटेल म्हणाले. पक्षाने अपमानित केल्याची त्यांची भावना आहे? या प्रश्नावर प्रफुल पटेल म्हणाले, “तुम्ही जो शब्दांचा वापर करताय तो योग्य नाही. ठीक आहे, ते बोलले असतील, मी यावर बोलणार नाही. भुजबळ आणि मी एका परिवारात, एका पक्षात काम करतो. काही घडलं असेल, तर गैरसमज दूर करू”
...बीड प्रकरणाशी थेट संबंध नाही : "धनंजय मुंडेंवर आरोप कोण लावत आहे? तर एक व्यक्ती आरोप लावत आहे, त्यांचे अंतर्गत वाद असू शकतात. बीड प्रकरणात फक्त सत्य बाहेर येवू द्या. आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही. बीड प्रकरणात सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरेश धस यांच्या बद्दल काही माहीत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जेव्हा आम्ही बोलतो, तेव्हा त्यांच्याकडून कधीच धनंजय मुंडे यांचा बीड प्रकणाशी थेट संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं नाही" असं प्रफुल पटेल म्हणाले.
हेही वाचा -
- प्रफुल पटेलांना मोठा दिलासा, ईडीनं सीजे हाऊसमधील मालमत्तेवर केलेली जप्तीची कारवाई रद्द - Praful Patel Money Laundering Case
- भाजपाबरोबर जाण्यास शरद पवार 50 टक्के तयार होते; प्रफुल पटेलांच्या दाव्यात किती तथ्य? पवार म्हणाले... - Praful Patel on Sharad Pawar
- सत्तेत सहभागी होताच प्रफुल्ल पटेलांना सीबीआयची क्लीनचीट; क्लोजर रिपोर्ट दाखल - Praful Patel Cbi Clean Chit