मुंबई Wadala Murder Case : वडाळ्यातील शांतीनगर झोपडपट्टीतून 28 जानेवारीला बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय मुलाचा शीर नसलेला मृतदेह वडाळा ट्रक टर्मिनल्स (टीटी) पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. या प्रकरणी नागरिकांनी एका पश्चिम बंगालच्या संशयिताला पकडून पोलीस ठाण्यात नेलं होतं. मात्र, त्यानं पोलिसांच्या 'हातावर तुरी' दिल्या. या घटनेमुळं पोलिसांचे धाबे दणाणले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी आता पोलीस पथकं काश्मीर आणि कोलकाताकडं रवाना झाली आहेत.
डीएनए चाचणी होणार : वडाळा टीटी पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाचे कुजलेले अवस्थेतील दोन्ही भाग ताब्यात घेतल्यानंतर त्याचं के ई एम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार देत आरोपीला पकडण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून तपास सुरू असल्याची माहिती, वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली आहे. तर मृतदेह ताब्यात घेण्याआधी डीएनए चाचणी करा, अशी पालकांनी मागणी केली आहे. त्यावर आज मुलाच्या आई-वडिलांचे डीएनए टेस्टसाठी नमुने घेतले जाणार आहेत.
नेमकं काय घडलं : वडाळा पूर्वेकडील शांतीनगर परिसरात राहात असलेल्या 49 वर्षीय तक्रारदार यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा 12 वर्षीय मुलगा 28 जानेवारीच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास घराबाहेर पडला मात्र तो घरी परतलाच नाही. सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्यानं अखेर त्याच्या वडिलांनी वडाळा टी टी पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी शांतीनगर परिसरात केलेल्या चौकशीत, हा लहान मुलगा याच परिसरात राहणाऱ्या बिपुल शिकारी नावाच्या तरुणासोबत जातानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघितल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यावेळी हा मुलगा बिपुल शिकारी याच्यासोबत जाताना येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. त्यानुसार, पोलिसांनी संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र तो पोलीस ठाण्याजवळील बाथरुममध्ये जात तेथून पसार झाला. त्यानंतर सोमवारी या मुलाचं कुजलेल्या अवस्थेतील धड आणि मंगळवारी शिर वडाळ्यातील खाडीजवळ सापडलं.
आरोपीचा शोध सुरू :मृतदेहावरील कपडे हातातील कडे आणि चप्पल यावरून कुजलेल्या मृतदेहाची ओळख पोलिसांना जरी पटली असली तरी मुलाच्या पालकांनी डीएनए चाचणीसाठी पोलिसांकडे मागणी केली आहे. तर वॉन्टेड आरोपी बिपुल शिकारी याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं काश्मीर आणि कोलकाता येथे रवाना झाली आहेत. बिपुल शिकारी यानं मुलाला किडनॅप करून त्याची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
हेही वाचा -
- मुंबईत बालकांचे 'विकृत शिकारी'; वडाळ्यात बालकाचं धड अन् शिर आढळल्यानं खळबळ, बंगालचा संशयित पळाला
- कायद्याचा धाक गेला कुठं?, लोकांच्या रागानं गाठला कळस; जिल्ह्यात दोन महिन्यांत 13 जणांचा खून
- बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर भर रस्त्यात सपासप वार, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मृत्यू