पुणे : सध्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलं ही मोबाईलचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. जेवण करताना मोबाईल, घरी असताना मोबाईल, तसंच झोपताना देखील मोबाईलचा वापर होतो. मोबाईल स्क्रीनचा वापर अधिक होत असल्यानं लहान मुलांवर याचा मोठा परिणाम होत आहे. हीच बाब लक्षात घेत दाऊदी बोहरा समाजानं मोठा निर्णय घेतला आहे. या समाजानं 15 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाचं समजाकडून स्वागत करण्यात येत असून हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं बोललं जातय.
लहान मुलांना मोबाईल बंदी : जगातील प्रत्येक छोट्या मोठ्या देशात शहरात दाऊदी बोहरा समाज हा आपल्याला पाहायला मिळतो. या समाजाची ओळख म्हणजे या समाजाचे लोक व्यवसाय करतात. अतिशय जागृत आणि एकमेकांना मदत करणारा, अशी या समाजाची ओळख आहे. या समाजाचे धर्मगुरू सय्यदना यांनी मुंबई येथे झालेल्या व्याख्यानात समाजातील लहान मुलांना मोबाईल बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोबाईल न वापरण्याबाबत जनजागृती : याबाबत दाऊदी बोहरा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते युसुफ डांबरवाले म्हणाले, "सध्या लहान मुलांमध्ये मोबाईल स्क्रीन बाबतचा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त आमच्या समजापुरता मर्यादित नाही. आजकाल प्रत्येकाच्या घरात ही समस्या निर्माण झाली आहे. लहान मुलं सध्या मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत असतात. मुलं रडली किंवा जेवत नसली की त्यांना पालकही मोबाईल देतात. हीच बाब लक्षात घेत धर्मगुरू सय्यदना यांनी प्रवचनात 15 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाचं आम्ही सर्वजण पालन करत आहोत. तसंच ठिकठिकाणी जाऊन मुलांमध्ये मोबाईल न वापरण्याबाबत जनजागृती करत आहोत."
हा क्रांतिकारी निर्णय : यावेळी याच समाजाचे मुर्तुझा मॅनेजर म्हणाले, "जेव्हा आमच्या सय्यदना यांनी हा निर्णय घेतला तेव्हापासूनच आम्ही याची अंमलबजावणी ही सुरू केली आहे. आमच्यात धर्मगुरू सय्यदना जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असतो. आता त्यांचा हा निर्णय लहान मुले देखील मान्य करत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझी मुलं मोबाईल वापरत नाहीत. हा क्रांतिकारी निर्णय असून मी तर सर्वांना आवाहन करेन की, याची अंमलबजावणी सर्वांनी करावी."
हेही वाचा -