मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. "राज्य सरकार भ्रष्टाचारी असून, या सरकारनं भ्रष्टाचाराचा कळस आणि कारभाराचा कीळस गाठलाय. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारच्या विरोधात येत्या एक सप्टेंबरला महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन करण्यात येईल," अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुंबईत करणार आंदोलन : सिंधुदुर्गातील मालवण राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मालवण राजकोट परिसराची पाहणी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हुतात्मा चौकात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं.
मोदी शाहांचे दलाल, शिवद्रोही आडवे :"सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचा कळस आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आलं. मात्र, तिथं मोदी शाहांचे दलाल आणि शिवद्रोही आडवे आले. महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह राज्य सरकारवर प्रहार केला.