ठाणे -अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अंबरनाथ शहरातून दोघांना ठाण्यातील गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आलंय. तर या हत्येचा कटातील दोन जण फरार झाले आहेत. पोलीस पथक त्याच्या शोधासाठी दिल्लीत दाखल झाले असून, लवकरच दोन्ही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मात्र अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे पोलिसांनी गुप्त ठेवलीत.
किणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तातदेखील वाढ :आमदार किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. शिवाय ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जवळचे आणि विश्वासू आमदार आहेत. ते आपल्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी लातूरला जाणार होते. त्याच लग्न समारंभाच्या ठिकाणी त्यांची हत्या करण्याचा डाव होता. मात्र याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतलंय. एकाला खुंटवली गावातून तर दुसऱ्याला स्वामीनगरमधून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलीय. शिवाय किणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तातदेखील वाढ करण्यात आलीय. दरम्यान, याप्रकरणी किणीकर समर्थक आक्रमक झाले असून, अंबरनाथ बंदची हाक दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. किणीकर या संदर्भात लग्नाहून आल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत.
यापूर्वीही ठार मारण्याच्या धमक्या :विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील राजकीय नेत्यांचा हत्येचा इतिहास पाहता आठवले गटाचे नरेश गायकवाड, भाजपाचे वसंत पांढरे, शिवसेनेचे नितीन वारिंगे, प्रसन्ना कुलकर्णी यांच्यासह देवराम वाळूंज, किशोर सुळे, रमेश गोसावी, अशोक गायकवाड या नेत्यांची हत्या झालीय. खळबळजनक बाब म्हणजे आमदार किणीकर यांना यापूर्वीही ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. आता पोलीस त्याच दिशेनं पुन्हा तपास करीत असल्याचे सांगण्यात आलंय. या गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या अटकेनंतर आमदारांची हत्या कोण आणि कशासाठी करणार होते हे तपासात पुढे येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.
आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना अटक, तर दोघे फरार; गुन्हे शाखेची कारवाई - MLA BALAJI KINIKAR
शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं अटक केली, तर दोघांनी फरार होण्यात यश मिळवलंय.
बालाजी किणीकर यांच्या हत्येचा प्रयत्न (Source- ETV Bharat)
Published : Dec 26, 2024, 1:34 PM IST