मुंबई -राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर जिल्ह्यांतील ऑनर किलिंगच्या घटना वाढल्यात. दरम्यान, गेल्या वर्षभरात राज्यात ऑनर किलिंगच्या किती घटना घडल्या? आंतरजातीय विवाह जोडप्यांच्या सुरक्षेसाठी आणि जो जोडीदार असतो त्याच्या समुपदेशनासाठी आणि सुरक्षागृहात काय स्थिती आहे? यावर काय उपाययोजना करणार? याचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला आणि बालकल्याण आणि सामाजिक न्याय विभागाला दिलेत. दरम्यान, संभाजीनगर, लातूर आणि कोल्हापूर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनांबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतलाय.
‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय :दरम्यान, राज्यातील ऑनर किलिंगच्या वाढत्या घटना ही गंभीर बाब आहे. आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा हा खूप महत्त्वाचा असतो. आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. अशा घटनामध्ये मारहाण ते थेट खुनापर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतलाय. मात्र यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बालविकास आयुक्त राहुल मोरे, लातूर आयुक्त, संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, महिला आणि बालविकास विभाग, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांना दिलेत.