ठाणे- ऑनलाईन जंगली रमीच्या नादात एका तरुणानं चोरीचा मार्ग पत्करल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. या चोरट्या तरुणाकडून रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला पुणे जिल्ह्यातील चाकणमधून अटक केलीय. योगेश निवास चव्हाण असे अटकेतील चोरट्याचं नाव असून, रेल्वे पोलीस पथकानं त्याच्याकडून 7 लाख 7 हजारांचे दागिने हस्तगस्त करून जप्त केल्याची माहिती कल्याण रेल्वे गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिलीय.
ट्रे वरील पर्स दागिन्यासह चोरट्याने लांबवली : रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये राहणारे तक्रारदार राहुल सुहास सोनी (33 ) हे 6 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्टेशन येथून सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन असा कुटुंबासह प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या आईनं पर्स दोन्ही बर्थच्या मध्ये असलेल्या ट्रेच्या वर ठेवली. माढा ते कल्याण स्टेशनदरम्यान झोपून प्रवास करीत असताना ट्रे वरील पर्स आतील सोन्याच्या दागिन्यासह कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवली. झोपेचा फायदा घेऊन पर्स लंपास केल्याची कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सोनी यांनी तक्रार दिली अन् गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा योगेशच्या संशयितरीत्या हालचाली : दाखल गुन्ह्याच्या आधारे कल्याण रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकानं समांतर तपास सुरू केला असता माढा रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा योगेश हा संशयितरीत्या हालचाली करत असल्याचं दिसून आलं, तोच धागा पकडून अन् ओळख पटवून त्याचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधून काढला. त्यानंतर लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंतसह मंगेश खाडे (सायबर सेल) यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिटचे उपनिरीक्षक, प्रकाश चौगुले, पोलीस अंमलदार रवींद्र ठाकूर, प्रमोद दिघे, लक्ष्मण वळकुंडे, अजय रौंधळ, स्मीता वसावे, राम जाधव, वैभव जाधव, हितेश नाईक, अक्षय चव्हाण, रुपेश निकम, सायबर सेलचे अंमलदार विक्रम चावरेकर, अमोल अहिनवे, संदेश कोंडाळकर आणि पुणे येथील रेल्वे पोलीस अधिकरी दादासाहेब लाड, विशाल मोरे, यांच्या पथकानं तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी योगेश निवास चव्हाणला सापळा रचून पुणे जिल्ह्यातील चाकणमधून अटक केलीय.
7 लाख 7 हजारांचे दागिने जप्त : दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडे रेल्वे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बॅग आणि पर्स लंपास केल्याचे समोर आले, त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 7 हजारांचे दागिने जप्त केले. तसेच अधिक तपासात आरोपी योगेश चव्हाणला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद आहे, तो चोरीचे दागिने विकून मिळालेले सर्व पैसे जंगली रमीमध्ये हरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिलीय. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र ठाकूर करीत आहेत.
हेही वाचाः
पूनम ढिल्लनच्या घरातून हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याप्रकरणी पेंटरला अटक