बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्मीळ प्रकरण समोर आलं आहे. एक गर्भवती महिला तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता, गर्भवती महिलेच्या अर्भकाच्या पोटामध्ये अर्भक असल्याचं आढळून आलं आहे. या गर्भधारणेला मेडिकल भाषेत 'फिटस इन फिटू' असं म्हणतात.
कोणताही धोका न पत्करता महिलेची प्रसुती : बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी आली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी केली असता, यावेळी बाळाच्या पोटात असलेलं बाळ स्पष्टपणे दिसत होतं. कोणताही धोका न पत्करता सदर महिलेची प्रसूती करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. या महिलेचं वय 32 वर्ष असून तिला याआधी दोन अपत्यं आहेत.
'फिटस इन फिटू' म्हणजे काय? : निसर्गानं मानवाची अशाप्रकारे रचना केली आहे की, विशिष्ट वयानंतर आणि शारीरिक रचनेत बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करू शकतात. मात्र, आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले आहेत. नऊ महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत असलेल्या गर्भधारणेला मेडिकल भाषेत 'फिटस इन फिटू' असं म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणं ही अशी घटना आहे. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरं अर्भक वाढतं. साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते. मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसामरी यांनी दिली.
देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात मात्र या ठिकाणी हे बाळ त्या आईला आणि तिच्या मुख्य बाळाला धोका निर्माण करु शकतं. आता डॉक्टर यावर नेमका काय उपाय करतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा :