मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांच्या पत्नी मेधा सोमैया यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या प्रकरणी आज (25 ऑक्टोबर) माझगाव न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाकडून 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन देण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊतांना मोठा दिलासा मिळालाय.
राऊतांनी सोमैया कुटुंबावर केला होता आरोप : माझगाव येथील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांच्या न्यायालयानं हा दंड व शिक्षा ठोठावली होती. कोरोनाच्या काळात एका शौचालय घोटाळ्यामध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया व त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या व त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. खासदार राऊत यांच्या या आरोपांविरोधात मेधा सोमैया यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात संजय राऊत यांना दोषी ठरविण्यात आलं असून त्यांना 15 दिवसांची कैद व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याप्रकरणी शुक्रवारी राऊत माझगाव न्यायालयात हजर झाले. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. याप्रकरणी पुढील सुनावणी 21 जानेवारी 2025 रोजी होईल.