मराठा आंदोलक फुटलेल्या कारजवळ जमलेले नांदेडBalaji Kalyankar Car Vandalized :अज्ञातांकडून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाने त्यांची गाडी फोडली. यावेळी 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देत मराठा आंदोलकांनी आमदार कल्याणकर यांचा जाहीर निषेध केला.
'हे' आहे रोषाचे कारण :आमदार कल्याणकर यांच्यावतीनं मराठा आरक्षणासाठी कुठले प्रश्न विचारले आणि सरकारमध्ये असून मराठा समाजाला न्याय दिला नाही असा आरोप लावत मराठा आंदोलकांनी कल्याणकर यांचा निषेध व्यक्त केला. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. तर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे एका कार्यकर्त्यांच्या घरी आजारी रुग्णाची विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांच्या देखील ताफ्यातील गाडी फोडण्यात आली आहे. भाजपाचे आमदार राम पाटील रातोलीकर यांना देखील मराठा आंदोलकांनी घेराव घातला. तर नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांची देखील गाडी फोडण्यात आली होती.
सकल मराठा समाजाचे आवाहन :मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर पुढाऱ्यांना गावबंदी असताना देखील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी गावात येऊ नये, असे आवाहन सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक शाम पाटील यांनी केले आहे.
मराठा आंदोलकांनी बस पेटवली : मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त मराठा आंदोलकांनी जालना जिल्ह्यात 26 फेब्रुवारी, 2024 रोजी एसटी बस पेटवली होती. अंबड तालुक्यातील तीर्थपुरी येथे ही बस पेटवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली होती.
अंबड तालुक्यात संचारबंदी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. तसंच मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसंच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली होती.
हेही वाचा :
- मनोज जरांगे पाटलांचा बोलविता धनी शोधून काढणार; देवेंद्र फडणवीस आक्रमक
- जनतेच्या हक्कावर अतिक्रमण न करता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करावं, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
- मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मराठा आरक्षणाकरिता संतप्त आंदोलकांचा धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको